नागपूर : भाजीबाजारात हिवाळ्यात हिरव्यागार भाज्यांचे ढीग ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. यात मेथी, पालक आणि हरभरा भाजीचा समावेश आहे. यात हरभऱ्याच्या भाजीला शेवग्याचा भाव आला असून, हरभरा भाजी बाजारात ग्राहकांना ८० ते ९० रुपये किलो दराने विकत घ्यावी लागत आहे.
-हरभरा भाजीचा पुरवठा कमी
-हरभरा भाजीचा पुरवठा बाजारात फार कमी होतो. सध्या होलसेल बाजारात हरभऱ्याची भाजी ४० रुपये किलो आहे. परंतु, भाजी विक्रेत्यांकडे या भाजीचा दर ८० ते ९० रुपये किलो आहे. हरभरा भाजी खाणारे नागरिक कमी आहेत. त्यामुळे बाजारात या भाजीला फारसी मागणी होत नसल्यामुळे या भाजीचा पुरवठा कमी होत असल्याचे होलसेल बाजारातील भाजी विक्रेत्यांनी सांगितले.
-जिल्ह्यात ५९,१६४ हजार हेक्टरवर हरभरा
-हरभरा भाजी विकण्यासाठी ते झाड दोन झालेले असणे आवश्यक आहे. त्यानंतर खुडणी करता येते. नागपूर जिल्ह्यात ५९,१६४ हेक्टरमध्ये हरभरा पेरण्यात आला आहे. परंतु, मागणी कमी असल्यामुळे हरभरा भाजीचा पुरवठा कमी होत आहे.
भाजीपाल्याचे दर ५० टक्क्यांनी घसरले
-१५ दिवसांपूर्वी भाजीपाल्याचे दर अधिक होते. परंतु, या आठवड्यात भाजीपाल्याचे दर ५० टक्क्यांनी घसरले आहेत. दरवर्षी हिवाळ्यात भाज्यांचे दर घसरतात. हे दर जानेवारी महिन्यापर्यंत असेच राहणार असल्याची माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली.
या भाज्यांनाही वाढली मागणी
-भाजी बाजारात पालक, मेथी, हरभरा भाजी, शेवगा, वांगे, फूलकोबी, पत्ता कोबी, चवळी, गवार, वाल, कारले, शिमला मिरची, आदी भाज्यांना मागणी वाढली आहे. यातच भाज्यांचे दर घसरल्यामुळे सर्वसामान्य नागरिक भाजी खरेदीसाठी बाजारात गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.
होलसेलमध्ये भाव कमी
-किरकोळ बाजारात भाजीचे दर अधिक पाहावयास मिळत असले तरी होलसेलमध्ये भाज्यांचे दर अतिशय स्वस्त आहेत. यात शेवगा १२० रुपये, मेथी १२ रुपये किलो, पालक २० रुपये किलो, वांगी १० रुपये किलो, फूलकोबी ५ रुपये किलो, पत्ता कोबी ६ रुपये किलो, चवळी २० रुपये किलो, गवार ४० रुपये किलो, वाल २५ रुपये किलो, कारले ३० रुपये किलो आणि शिमला मिरची ३० रुपये किलो दराने विकली जात आहे.
जानेवारीपर्यंत दर राहणार कमी
‘भाजीचे दर हिवाळ्यात घसरतात. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात बाजारात भाजीपाला विक्रीसाठी येतो. त्यामुळे भाजीचे दर कमी होतात. हे दर जानेवारीपर्यंत कमीच राहणार आहेत.’
राम महाजन, सचिव, महात्मा फुले आडतिया असोसिएशन
.........