जनताच खोके सरकारची कॅच घेणार, शिंदे, फडणवीस, पवार ‘हिट विकेट’होणार

By कमलेश वानखेडे | Published: July 6, 2024 06:51 PM2024-07-06T18:51:54+5:302024-07-06T18:52:44+5:30

नाना पटोले यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना उत्तर : वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ

The public will catch the government, Shinde, Fadnavis, Pawar will be 'hit wickets' | जनताच खोके सरकारची कॅच घेणार, शिंदे, फडणवीस, पवार ‘हिट विकेट’होणार

Shinde, Fadnavis, Pawar will be 'hit wickets' by people

कमलेश वानखेडे, नागपूर

नागपूर : क्रिकेट विश्वकप विजेत्या टीमचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हीही दोन वर्षापूर्वी विकेट काढली होती, असे विधान केले होते. या विधानाचा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी नागपुरात खरपूस समाचार घेतला. पटोले म्हणाले, ७० दिवसानंतर खरी मॅच सुरु होणार आहे. दोन वर्षापूर्वी जे झाले तो लपवाछपवीचा, खोक्यांचा खेळ होता. आता खरा सामना जनतेच्या दरबारात होणार आहे. जनतेची काळजी नसलेले मुख्यमंत्री आहेत, सरकारच अदानीसाठी काम करत असून आता जनताच खोके सरकारची कॅच घेणार असून या मॅचनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे ‘हिट विकेट’ होणार आहेत, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

पटोले म्हणाले, शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी त्यांना क्लिन चीट देणे म्हणजे भाजपाच्या वॉशिंगमशीन मधून वायकरांना स्वच्छ केल्याचे आणखी एक प्रकरण आहे. मोदी सरकार हे ईडी व सीबीआय या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे. अशी एखादी घटना समजू शकतो पण अनेक उदाहरणे आहेत, वायकर त्यातील एक प्रकरण आहे. लोकसभा निवडणुकीआधी पक्ष बदलून वायकर सत्ताधारी पक्षाबरोबर गेले तेव्हाच त्यांनी सांगितले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना क्लिन चिट देऊन फाईल बंद केली यात नवल वाटण्यासारखे काही नाही.

गृहमंत्री फडणवीस यांची कृती काहीच नाही

पुण्यात महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्यात कायदा सुव्यवस्था कुठे राहिली आहे. महाराष्ट्र पोलीसच सुरक्षित नाहीत ही परिस्थीती आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त घोषणा करतात कृती मात्र काहीच नाही, अशी टीका पटोले यांनी केली. जेलमधील आरोपींना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळते, ससून रुग्णालयात उपचाराच्यानावाखाली आरोपींना फाईव्हस्टार व्यवस्था दिली जाते. प्रशासन व पोलीस कुठे आहे हे कळत नाही. नागपूरमध्येही राम झुलावर मद्यधुंद कारचालकाने दोन मुलांना कारखाली चिरडून मारण्याची घटना झाली, ती केस कमजोर करण्यासाठी पोलिसांवर दबाब होता. त्यामुळे या आरोपींना लागलीच जामीन मिळाला. धनदांडग्या घरातील आरोपींना कसलीच भिती राहिली नाही म्हणूनच महिला पोलिसाला जाळण्याची हिम्मत होते असे पटोले म्हणाले.

महाविकास आघाडी एकत्र लढणार
विधानसभेची निवडणूक तीनही पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढतील. ज्या जागा सुटतील त्यावर आम्ही लढू, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

Web Title: The public will catch the government, Shinde, Fadnavis, Pawar will be 'hit wickets'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.