नागपूर : सकाळपासून उन निघाल्यानंतर दुपारी ४ वाजताच्या दरम्यान अचानक झालेल्या पावसाने लाेकांना भिजविले खरे, पण हा ओलावा अधिक काळ टिकला नाही. अर्ध्या तासात पाऊस थांबला आणि पुन्हा उन निघाले. इकडे वेधशाळेने नागपूरसह विदर्भात सर्वत्र मध्यम ते जाेरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
जुलैचा पहिला आठवडा संपत असताना पावसाचा जाेर काही वाढलेला दिसत नाही. विदर्भात पाऊस पडताे पण त्यात सातत्य दिसून आले नाही. क्षणापुरता बरसताे आणि निघून जाताे. शुक्रवारीही नागपुरात जाेराची सर आली आणि पुन्हा उघडीप दिली. सारखे चित्र शनिवारीही हाेते. सकाळपासून आकाशात उनही पडले हाेते. दुपारी ४ वाजताच्या सुमारास पावसाची जाेरदार सर नागपुरात पडली. मात्र अर्ध्या तासानंतर पुन्हा उन निघाले. त्यामुळे नागपूर केंद्रावर नाेंदही झाली नाही. हवामान तज्ज्ञांच्या मते हा वळीव पावसाचा प्रकार हाेय. उन निघाल्यामुळे तापमानात अंशत: वाढ झाली व पारा ३४.६ अंशावर नाेंदविला गेला. विदर्भात अकाेला वगळता सर्वत्र तापमान अंशतः वाढले. बुलढाणा, अकाेला व वर्धा या तीन जिल्ह्यात हलक्या सरी बरसल्याची नाेंद झाली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे पाच दिवस विदर्भात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस हाेण्याची शक्यता आहे. मात्र जाेरदार व संततधार पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागण्याचा अंदाज आहे.