नागपूर : कळमन्यात वर्षभरात जवळपास २० ते २२ वेळा अवकाळी पावसामुळे खुल्या जागेतील धान्य भिजण्याच्या घटना घडतात आणि शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. त्यानंतरही कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना जाग येत नाही. खुल्या जागेत तात्पुरती शेड उभारण्याची ३५ वर्षांपासून करण्यात येणारी मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. समिती शेतकऱ्यांच्या सुविधांकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा प्रत्यय बुधवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या पावसात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या घटनेने आला आहे.
बाजारात धान्याची आवक कमी असल्यामुळे मध्यरात्री जवळपास २ हजार धान्यांची पोती भिजली. हा अवकाळी पाऊस १५ दिवसांपूर्वी आला असता तर शेतकऱ्यांची जवळपास २५ हजार पोती भिजली असती. आता १५ दिवसांवर पेरणी आल्यामुळे शेतकऱ्यांकडून बाजारात धान्याची कमी आवक होत आहे. मात्र, हीच घटना १५ दिवसांपूर्वी घडली असती तर स्थिती दयनीय झाली असती. सध्या हरभरा, तूर आणि गहू यांची आवक पूर्वीच्या तुलनेत फारच कमी आहे. हरभरा पावसात भिजल्यामुळे खराब होतो आणि त्यामुळे भाव ३०० ते ४०० रुपयाने कमी होतो.
गेल्या १५ दिवसांच्या तुलनेत उठाव नसल्यामुळे हरभरा, तूर आणि गव्हाचे भाव कमी झाले आहेत. सध्या बाजारात हरभरा ४,२०० रुपये क्विंटल, तुरीचा ५,५०० ते ६ हजार रुपये क्विंटल भाव आहे. तेजी-मंदी खेळणाऱ्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनाही याचा फटका बसणार आहे.
लिलावाच्या शेडबाहेर असते धान्य
लिलावाच्या जागेत तात्पुरती शेड उभारण्याची मागणी गेल्या १५ वर्षांपासून समितीकडे वारंवार करत असल्याचे समितीचे संचालक आणि धान्य बाजाराचे अध्यक्ष अतुल सेनाड यांनी सांगितले. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. बोलीसाठी जास्त धान्य आल्यास रस्त्यावर ठेवावे लागते. व्यापाऱ्यांनी माल उचलेपर्यंत तो तसाच असतो. अशावेळी अवकाळी पाऊस आल्यास तो भिजतो. हे लिलाव दालन ३५ वर्षांपूर्वी तयार झाले आहे. शेड उभारण्यासाठी त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे. कारण धान्य भिजल्यास शेतकऱ्यांच्या धान्याला भाव मिळत नाही आणि त्यांचे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांवर अशी वेळ दरवर्षीच येते. त्यामुळे समितीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
डोम उभारण्याची मागणी समितीकडे पुन्हा करणार
काहीच दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. यावेळी खुल्या जागेतील धान्य भिजण्याची भीती आहे. त्यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून शेड उभारण्याची मागणी धान्य बाजार असोसिएशन अडतिया समितीच्या अध्यक्षांकडे करणार आहेत.