नागपूर : काही दिवसांपासून विदर्भात सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जाेर पुढचे काही दिवस कमी हाेण्याची शक्यता आहे. मात्र नागपूर व भंडारा जिल्ह्यात आणखी एक दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असून, हवामान खात्याने या दाेन जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान, गुरुवारी गडचिराेली, चंद्रपुरात हलकी रिमझिम वगळता सर्वत्र पावसाने उघडीप दिली.
गेल्या चार-पाच दिवसांत पावसाने विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात धुवाधार फटकेबाजी केली आहे. हा जाेर गुरुवारी सकाळपर्यंत कायम हाेता. बुधवारी रात्री वेगवेगळ्या भागात जाेरदार पाऊस झाला. नागपुरात रात्री ११ वाजताच्या सुमारास तुफान पाऊस झाला व ४९.४ मि.मी. पावसाची नाेंद झाली. कुही, काटाेल, नरखेड तालुक्यांतही पावसाने चांगली हजेरी लावली. गडचिराेली जिल्ह्यातील अहेरीमध्ये सर्वाधिक ९९.६ मि.मी. पावसाची नाेंद करण्यात आली. शहरासह बहुतेक तालुक्यातही दमदार पाऊस झाला. चंद्रपूर शहरात नगण्य पाऊस झाला; पण जिवती तालुक्यात ८४.३ मि.मी.सह ब्रह्मपुरी, पाेंभुर्णा, राजुरा तालुक्यातही पावसाने जाेर दाखविला. पश्चिम विदर्भात मात्र ढगांनी २४ तासापासून काहीसी उसंत घेतली आहे. अमरावती, अकाेला, वर्धा, यवतमाळ, बुलढाण्यात तुरळक हजेरी लागली. गुरुवारी दिवसभरही पावसाने शांतता पाळली. उघाड मिळाल्याने गडचिराेली, चंद्रपुरात विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे.
पुढचे २४ तास नागपूर, भंडारा जिल्ह्यात मुसळधार; तर चंद्रपूर, गडचिराेली, गाेंदियात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी चांगला पाऊस हाेण्याची शक्यता वर्तवली आहे. दाेन दिवस जाेर कमी राहील; पण त्यानंतर पुन्हा पाऊस तीव्र हाेण्याचा अंदाज आहे.
विदर्भात पाऊस सरासरीत
विदर्भात सध्या पावसाची स्थिती सामान्य आहे. १ जून ते २० जुलैपर्यंत ३७२.३ मि.मी. पाऊस अपेक्षित असते. आतापर्यंत ३५३.७ मि.मी. पाऊस झाला असून ५ टक्क्यांची नगण्य तूट शिल्लक आहे. पश्चिम विदर्भात अकाेला, अमरावती, वर्धा जिल्ह्यात तूट २० टक्क्यांहून अधिक आहे.