नागपूर : नाणारच्या जागी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे रिफायनरी उभारण्याच्या प्रयत्नांना वेग आल्याने विदर्भातील या प्रकल्पाचे समर्थकही आवाज उंच करत आहेत. विदर्भातील रिफायनरीबाबत काही अडचण असेल, तर किमान पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स स्थापन करावे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातही रिफायनरी उभारली जाऊ शकते, असे पेट्रोकेमिकल तज्ज्ञ विनायक मराठे यांनी स्पष्ट केले.
मराठे यांनी गुरुवारी लोकमत भवनात ‘लोकमत’ समूहाच्या संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार विदर्भातील पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सची तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचा उपक्रम तातडीने सुरू करण्यात यावा. ‘वेद’च्या पुढाकाराने तज्ज्ञांनी विदर्भातील प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास केला असून तो फायदेशीर ठरेल, असे त्यांना आढळले आहे. याचा फायदा मध्यम आणि लघु उद्योगांना होणार आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे पेट्रोकेमिकल उत्पादनांची मागणी तिपटीने वाढली आहे. भटिंडा, पानिपत, बीना यांसारख्या सागरी किनाऱ्यापासून दूर उभारलेले पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स देखील फायदेशीर आहेत. विदर्भही यासाठी अनुकूल ठरेल, असे ते म्हणाले.
लष्करी दृष्टिकोनातूनही विदर्भ अनुकूल
विदर्भातील हा प्रकल्प लष्करी दृष्टिकोनातूनही अनुकूल ठरेल, असे वेदचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी यावेळी सांगितले. इतर प्रकल्प देशाच्या सीमेजवळ आहेत, तर विदर्भ दूर आहे. आपत्कालीन परिस्थितीत हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. समृद्धी महामार्गाजवळ पाईपलाईन टाकल्याने सुमारे ७०० कोटी रुपयांचा महसूल मिळेल. शिवाय या मार्गावर वाहतूक वाढल्याने टोल टॅक्स कमी होण्यास मदत होईल, असा दावादेखील त्यांनी केला.
काय म्हणाले तज्ज्ञ...
- कच्चा माल आणण्यासाठी महामार्गाजवळ पुरेशी जागा.
- विदर्भात प्रकल्पासाठी पुरेशी जागा आणि पाणी.
- कोकणच्या तुलनेत विदर्भात दळणवळण व मार्केटिंगचे जाळे बऱ्यापैकी मजबूत आहे.
- सामाजिक दृष्टिकोन लक्षात घेऊन विदर्भाची निवड करावी.
- पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व्यावहारिक, त्याच्या उत्पादनांची मागणी वाढत आहे.
- विदर्भात केमिकल झोन नाही, या प्रकल्पामुळे लघु व मध्यम उद्योग विकसित होतील.