नागपूर : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाची टक्केवारीत वाढ करणे फार महत्वाचे असून त्यादृष्टीने सर्वांनी मतदार नोंदणीचे काम युद्धस्तरावर करावे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने कामात गती आणा.दिवाळी जवळ येत असून दोन महिन्यात मतदार नोंदणीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करा. ७५ हजार नवमतदारांची नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी जबाबदारी घेऊन नवमतदारांची नोंदणी करून घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केल्या.
सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक व बीएलओंसोबत मतदार नोंदणी विषयक आढावा बैठक वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रविण महिरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पर्यवेक्षक व बीएलओंनी गांभीर्याने याकामात लक्ष देऊन मर्यादेत मतदार नोंदणी, मयत मतदारांचे नाव वगळणे व दुय्यम मतदार वगळणे, मतदार यादी शुध्दीकरण आदींसाठी नमुना क्र. ६, ७ व ८ भरुन घेण्यासाठी पुन्हा घरोघरी भेटी द्याव्यात. या कामात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक विभागाच्या पत्रानुसार मयत मतदार वगळण्यासाठी मृत्यु प्रमाणपत्राची अट नाही. बीएलओंनी पंचनामा करावा किंवा त्यांच्या मयताच्या नातेवाईकांकडून नमुना भरुन घ्यावा. निवडणूक पर्यवेक्षकांनी दररोज बीएलओकडून अहवाल घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.