नागपूर : वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे वयाची मर्यादा ५८ वरून वाढवून ६२ करण्यात आली होती; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आता ३१ मे २०२२ पर्यंत ६० वर्षांवरील सर्वच डॉक्टर घरी बसणार आहेत, यात कुठलाही बदल होणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टपणे सांगितले.
आरोग्य विभागाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी नागपुरात आले असताना पत्रकारांना ते म्हणाले, कोरोनामुळे डॉक्टरांच्या वयोमर्यादेवर निर्णय होऊ शकला नाही; परंतु आता डॉक्टरांचे वय ५८ राहणार आहे. या निर्णयामुळे नव्या अधिकाऱ्यांना संधी मिळेल. राज्यात आरोग्य विभागातील एकही पद रिक्त राहणार नाही. याकडेही लक्ष दिले जात असल्याचे ते म्हणाले.
चौथ्या लाटेच्या चर्चेत तथ्य नाही
राज्यात कोरोनाचे आज २५४ नवीन रुग्ण आढळून आले असून ९८ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाचे कमी-जास्त रुग्ण दिसूनच येणार आहे. यामुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या चर्चेत आता काही तथ्य नाही, असेही टोपे म्हणाले.
बूस्टर डोस विकत घ्यावा
हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स व ६० वर्षांवरील प्रत्येकाला कोरोना प्रतिबंधक बूस्टर म्हणजे प्रिकॉशन डोस मोफत दिला जात आहे; परंतु १८ ते ५९ वयोगटासाठी हा डोस खासगी केंद्रामध्ये जाऊन विकत घ्यावा लागत आहे. केंद्राने या वयोगटासाठी मोफत लस उपलब्ध करून दिली तरच ती लोकांना देता येईल. सध्या तरी ज्यांना बूस्टर डोसची गरज आहे त्यांनी तो विकत घ्यावा.
‘मंकी पॉक्स’बाबत अलर्ट
‘मंकी पॉक्स’चा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेने ब्रिटनमध्ये ‘मंकी पॉक्स’ विषाणूचे रुग्ण वाढतील, असा इशारा दिला आहे. केंद्राच्या आरोग्य विभागाने अलर्ट दिला आहे. त्यानुसार सर्व सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत, असेही टोपे म्हणाले.