निशांत वानखेडे/राजेश टिकलेनागपूर : बालपण संपले आणि तारुण्य सुरू झाले की अनेक आवडींपैकी कार किंवा बाईक चालविण्याची आवडही बळावत जाते. मात्र, कुणी ती स्वत: तयार करून चालविण्याचा विचार करीत नाही. स्वप्निल मात्र याला अपवाद ठरला. रेसिंग कार चालविण्याची प्रबळ इच्छा; पण ती खरेदी करणे त्याच्या क्षमतेच्या पूर्ण बाहेर. मग काय, या पठ्ठ्याने भंगार साहित्याचा देशी जुगाड करून रेसिंग कार तयार केली. २६ जानेवारीला नागपूरच्या रस्त्यावर त्याची यशस्वी ट्रायलही घेतली.
स्वप्निल चाेपकर असे या तरुणाचे नाव. तो एमए करीत आहे. त्याचे वडील काशीनाथ चाेपकर हे बेकरीच्या मालाचे वितरण करतात, तर आई फिजिओथेरेपिस्ट आहे. स्वप्निललाही बालपणापासून माेटारसायकल, कार चालविण्याची हाैस; पण थाेडा तारुण्यात आला तेव्हा ही वाहने आपण स्वत: तयार करावी, अशी त्याची इच्छा. या इच्छेपाेटी त्याने अल्पवयात असतानापासून मिळेल त्या गॅरेजमध्ये काम करणे सुरू केले. रेसिंग कार चालविणे हे त्याचे स्वप्न हाेते; पण ती खरेदी करणे जवळजवळ अशक्य हाेते. मग त्याने भंगार साहित्यातून कारची निर्मिती सुरू केली. ८०० सीसी इंजिन, स्टिअरिंग व चाकेही मारुतीची, पॅनल इतर गाड्यांचे आणि इतर साहित्यही भंगारातून आणले. कार तयार केली. मागील वर्षी २६ जानेवारीला ती गाडी रस्त्यावर उतरविली; पण हा प्रयत्न फसला. त्याने पुन्हा काम सुरू केले आणि दीड वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर त्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला. त्याच्या जुगाड कारने २६ किमीचा प्रवास पूर्ण केला.
भंगारातून कार तयार करता येते; पण ती रस्त्यावर धावायलाही हवी. त्यामुळे ही कार नेहमी चालवू शकेल, अशी बनविली आहे. यानंतर आरटीओ कार्यालयात जाऊन परवाना मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अशाप्रकारची निर्मिती पुढेही सुरूच ठेवणार. - स्वप्निल चाेपकर
भारतीय रस्त्यांना अनुकूल स्टिअरिंग असलेली ही कार ताशी १४० किमी वेगाने धावू शकते. इंजिनमध्ये बदल करून वेग खऱ्या रेसिंग कारप्रमाणे करता येताे.nरेसिंग कारचा बुडाचा भाग जमिनीला लागून असताे. मात्र, स्वप्निलने रस्त्यावरील खड्डे, ब्रेकर्स सहज ओलांडून जाईल अशी उंच कार बनविली आहे.nकारला सव्वा लाख रुपये खर्च आला. ही कार १६ ते १७ किमी/लिटरचा मायलेज देते.