नागपूर : वाठोडा येथे ३०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय स्थापन करण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. यासाठी शासनाने १८७ .७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रुग्णालयामुळे पुर्व नागपुरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या भागात एकही मोठे शासकीय इस्पितळ नसल्याने नागरिकांना उपचारासाठी अडचणी जात होत्या.
वाठोडा येथे इस्पितळ उभारण्यासाची मागणी अनेक दिवसांपासून होती. पुर्व नागपुरचे आमदार कृष्णा खोपडे, तत्कालिन नगरसेव यांनी नासुप्रकडे पाठपुरावा केला होता. नासुप्रचे सभापती मनोज सुर्यवंशी यांनी ३०० खाटांच्या इस्पितळाचा प्रकल्प अहवाल शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. वाठोडा भागातील चांदमारी मंदिराजवळील नासुप्रच्या २ एकर जागेवर हे इस्पितळ उभारण्यात येईल. ९ माळ्यांच्या या इस्पितळाचा १०० टक्के खर्च राज्य शासन उचलेल. रुग्णालयात अत्याधुनिक सोयी सुविधांचा समावेश असेल. पार्किंग, सोलर, हरित बांधकाम मानक, अग्निशमन यंत्रणा या रुग्णालयात असणार आहे. रुग्णालय उभारणीसाठी प्रकल्प सल्लागाराचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती कृष्णा खोपडे यांनी दिली.