नागपूर : २०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या विस्तारावर भर देत प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट संघाने ठेवले आहे. विशेषत: या कालावधीत सामाजिक बदलांसाठी संघातर्फे प्रयत्न करण्यात येणार असून विविध वस्त्यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. शंभरहून अधिक वस्त्यांमध्ये हे काम सुरू झाले आहे. अभ्यासातून समोर आलेल्या मुद्यांवर काम करून वस्त्यांमधील समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल.
संघाचे पश्चिम क्षेत्र कार्याधिकारी दीपक तामशेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या अ.भा. प्रतिनिधी सभेचा तपशील ठेवला. संघ शाखांची संख्या एक लाखांहून अधिक करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. एका वर्षात शाखांची संख्या ८ हजार ५३४ ने ने वाढून ६८,६५१ झाली आहे. विदर्भातही संघटना विस्ताराची ब्ल्यू प्रिंट तयार करून संघ शाखांची संख्या २१०० हून अधिक करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
विदर्भात ८५९ हून आता १ हजार ३८ ठिकाणी संघाचे काम सुरू आहे. मागील वर्षी १,५६१ संघाच्या शाखा होत्या व आता ही संख्या १ हजार ८९० इतकी झाली आहे. तर साप्ताहिक मिलनांची संख्या ५२४ वरून ६१६ वर पोहोचली आहे. पुढील काळात संघातर्फे विस्तारावरच भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोघे, विश्व संवाद केंद्राचे अतुल पिंगळे, संघाचे विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख डॉ.अमित कुशवाह, महानगर प्रचार प्रमुख ब्रजेश मानस प्रामुख्याने उपस्थित होते.
या गोष्टींवर भर
- सामाजिक समरसता- समृद्ध देशासाठी नवोपक्रम.- कुटुंब प्रबोधन- पर्यावरण संवर्धन (प्लास्टिक मुक्त, पाणी बचत)- स्वदेशी (भाषा, खाद्यपदार्थ, पोशाख यावर भर)
संघाचे यंदाचे तीन प्रमुख कार्यक्रम
-छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त २ जूनपासून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.-भगवान महावीरांच्या अडीच हजार वर्षांच्या महानिर्वाणाचा वर्षभर कार्यक्रम.- स्वामी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त जागोजागीकार्यक्रम.