नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मनासारखे वागण्यासाठी पालकांकडून मोकळीक मिळत नसल्याने दिल्लीतील दोन मुलींनी थेट चेन्नई एक्सप्रेस धरली. बेभान अवस्थेत घर सोडून निघालेल्या या दोघींची माहिती कळताच त्यांना रेल्वे पोलिसांनी आज दुपारी ताब्यात घेतले. त्यानंतर रेल्वेच्या पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांनी खुद्द या मुलींचे समुपदेशन करून त्यांचे भवितव्य सुरक्षित केले.सोना आणि मोना (नाव काल्पनिक, वय १५ वर्षे) या दोघी नॉर्थ दिल्लीतील नरेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. त्या दोघी वर्ग मैत्रीणी आहेत.
पालकांकडून फिरायला जाऊ दिले जात नाही. कुणाशी बोलण्याची मोकळीक नाही आणि मोबाईलही वापरू दिला जात नाही. सततची शारिरिक आणि मानसिक कोंडी होत असल्याने या दोघी कंटाळल्या होत्या. तारुणाच्या उंबरठ्यावर आल्या असताना मनसारखे काहीच करू दिले जात नसल्याने त्यांनी घरच्यांकडून होणारी कोंडी फोडण्याचे प्रयत्न केले. त्यानुसार, संधी साधून शुक्रवारी सायंकाळी त्यांनी घर सोडले. रात्री या दोघी दिल्ली चेन्नई अशी तिकिट घेत तामिळनाडू एक्सप्रेसमध्ये बसल्या. दरम्यान, मुली गायब झाल्याचे लक्षात येताच दोन्हीच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. चाैकशीत त्या तामिळनाडू एक्सप्रेसमध्ये बसल्याचे स्पष्ट होताच रेल्वे पोलिसांना तसा अलर्ट देण्यात आला. त्यांचे वर्णनही कळविण्यात आले. त्यामुळे सतर्क झालेल्या रेल्वे पोलिसांनी नजर रोखली. शनिवारी दुपारी १.१५ च्या सुमारास या दोघी प्रतिक्षालयात बसून दिसताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. नाव,गाव, पत्ता विचारल्यानंतर नॉर्थ दिल्लीतून पळून गेलेल्या त्या, या दोघीच असल्याचे स्पष्ट होताच रेल्वेच्या पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे तेथे पोहचल्या. त्यांनी मुलींची वास्तपूस्त केली. कुठे जाणार, काय करणार, कशा करणार, याबाबत काहीच निश्चित नव्हते. समाजकंटकांच्या नजरेस या दोघी पडल्या असत्या तर त्यांचे आयुष्य बर्बाद झाले असते. हे त्या दोघींच्या लक्षात आणून देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पालकांना माहिती देऊन नागपूरला बोलवून घेण्यात आले. निरीक्षणगृहात रवानगीपालकांना येण्यास विलंब होणार याची जाणिव असल्यामुळे या दोघींना पाटणकर चाैकातील शासकीय निरीक्षण गृहात ठेवण्यात आले. त्या दोघींचे पालक येथे आल्यानंतर त्यांचेही समुपदेशन करून मुलींना ताब्यात दिले जाणार आहे. ही कामगरी जीआरपीचे एपीआय सुनील उईके, पीएसआय थॉमस, हवलदार संजय पटले, मजहर अली आणि ममता तिवारी यांनी बजावली.