नागपूर : नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने १५ फेब्रुवारी रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मेयोच्या परिसरात बेकायदेशीर औषधांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पकडून तहसील पोलिसांच्या ताब्यात दिले. चार दिवसांनंतर सोमवारी अधिष्ठाता डॉ. संजय बिजवे यांनी चौकशीचे आदेश दिले. विशेष म्हणजे, या पूर्वीही असाच एक प्रकार आमआदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तत्कालिन अधिष्ठाता डॉ. मधुकर परचंड यांच्या नजरेस आणून दिला होता.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) औषधांचा तुटवडा नवी बाब नाही. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा पुढे आल्याने स्थानिक पातळीवर औषधी खरेदीचे अधिकार १० टक्क्याने वाढवून ३० टक्के केले. असे असतानाही, रुग्णालयातीलच काही व्यक्ती औषधी नसल्याचे सांगून रुग्णांच्या नातेवाइकांना विशिष्ट व्यक्तीकडून बेकायदेशीर औषधींची खरेदी करण्यास सांगितले जात होते. ही माहिती पुढे आल्याने याची गंभीर दखल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी यांनी घेतली. त्यांनी अधिष्ठाता डॉ. बिजवे यांना जाब विचारून लेखी कळविण्यासही सांगितले.
-व्हिडीओ पोलिसांकडे
प्राप्त माहितीनुसार, असोसिएशनने मेयोमध्ये केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’चे व्हिडीओ पोलिसांकडे दिले आहे. बेकायदेशीर औषधी विक्री करणाऱ्या तरुणांकडून औषधीही पोलिसांनी जप्त केल्या. औषध प्रशासनही (एफडीए) या प्रकरणातील तपास करीत आहे. सध्या कोणावरच कारवाई झाली नसल्याची माहिती आहे.
-दोन दिवसांत चौकशीचा अहवाल सादर
अधिष्ठाता डॉ. बिजवे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मेयो प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन चार सदस्यांची चौकशी समिती नेमली. पुढील दोन दिवसांत ते अहवाल सादर करतील. यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव विभागाकडे पाठविण्यात येईल.