नागपूर : आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे गेल्या काही काळातील भाषण ऐकलीत किंवा संघाने मुस्लिम समाजासाठी राष्ट्रीय मुस्लिम विचार मंचची स्थापना केली. मग संघाला जनाब संघ म्हणणार का? असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला केला आहे.
शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने संजय राऊतनागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संपर्क साधला. यावेळी, त्यांनी भाजप सरकारला धारेवर धरले.
केंद्रीय तपास यंत्रणेचा खुळखुळा झालाय. भाजप देशभरात सुडाचे राजकारण करत आहेत. जिथे भाजपचे सत्ता नाही त्या राज्यांमध्ये ईडीच्या कारवाया होत आहेत. माझ्यासह कुटुंबीयांवरही आरोप करण्यात आले. परंतु, दहशत निर्माण करून सरकार पाडता येणार नाही. दहशत हा शब्द आमच्या डिक्शनरीत नाही. महाराष्ट्र दिल्लीसमोर वाकणार नाही, असे राऊत म्हणाले.
विदर्भाच्या जनतेने बाळासाहेब आणि शिवसेनेवर प्रेम केले, खासदार निवडून दिले. परंतु, गेल्या काही काळापासून विधानसभेतील विदर्भातून शिवसेनेचं प्रतिनिधित्व कमी झालं असून त्याला काही कारणं आहेत. ते कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. युतीच्या काळात विदर्भाच्या जागा भाजपने घेतल्या आणि आमची विदर्भात पीछेहाट झाली. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून कामाला चालना देण्यासाठी आम्ही काम करत आहोत. नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. त्यामुळे सुरुवात नागपुरातून करत असल्याचे राऊत यांनी सांगितले.