नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्येला १४ दिवस उलटल्यावरदेखील त्यांचा मृतदेह आढळलेला नाही. जबलपूरमध्ये हिरन व नर्मदा नदीत त्यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात आला. मात्र, त्यात शोध पथकांना यश आले नाही. अखेर शोधकार्य थांबविण्यात आले आहे. सोमवारी कुठल्याही प्रकारचा शोध घेण्यात आला नाही. दरम्यान, नागपूर पोलिसांच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक तेथे पुरावे गोळा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सना खान या १ ऑगस्टला अमित साहूला भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ताच होत्या. गुरुवारी सना खान यांच्या आईने मानकापूर पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर तातडीने मानकापूर व गुन्हे शाखेचे पथक परत जबलपूरला पाठविण्यात आले. त्यानंतर अमित साहूला अटक झाली व त्याच्या चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली. अमितने हिरन नदीत सना यांचा मृतदेह फेकला होता. शुक्रवारपासून मध्यप्रदेशमधील एसडीआरएफ, जबलपूर पोलिस व नागपूर पोलिसांचे पथक मृतदेहाचा शोध घेत होते. घटनास्थळापासून सहा किलोमीटर अंतरापर्यंत शोध घेण्यात आला. हिरन व नर्मदा नदीच्या संगमाच्या जागेवरदेखील शोध घेण्यात आला. मात्र, कुठेही मृतदेहाचा मागमूस आढळला नाही.
आता घरातून पुरावे गोळा करणार
नागपूर पोलिसांचे पथक अद्यापही जबलपूरमध्येच आहे. अमितविरोधात ठोस पुरावे गोळा करणे आवश्यक आहे व त्यामुळेच पोलिसांनी आता अमित साहूने ज्या घरात सना यांची हत्या केली तेथे लक्ष केंद्रित केले आहे. तेथून पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक बोलाविण्यात आले आहे. यासाठी जबलपूर येथील गोराबाजार पोलिस ठाण्याच्या पथकाचीदेखील मदत घेतली जात आहे.