नागपूर : हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १० वर्षांच्या मुलीला घरकामाला जुंपल्यावर तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याच्या प्रकरणात पोलिसांना दुसरे यश मिळाले आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी अझहर शेख (३५) याला अटक करण्यात आली आहे. पोलिस सातत्याने त्याला ट्रॅक करत होते व बंगळुरूहून नागपुरात आल्यावर न्यायालय परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. हुडकेश्वर पोलिस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली.
बेसा-पिपळा मार्गावरील अथर्व नगरी-३ मधील घर क्रमांक ११ येथे अतिशय क्रूर प्रकार करण्यात आला होता. बंगळुरूमधील हलाखीच्या परिस्थितीतील एका कुटुंबातील मुलीला त्यांनी दोन वर्षांअगोदर नागपुरात आणले. त्या मुलीला लहानसहान चुकांवर अगदी चटके देणे, मारणे असे प्रकार झाले व तिच्यावर अत्याचारदेखील करण्यात आले. या प्रकरणात अरमान इश्ताक अहमद खान (३९), त्याची पत्नी हीना (२६) व मेहुणा अजहर (३५) हे आरोपी होते. पोलिसांनी अरमानला नागपूर विमानतळावरून अटक केली होती. तर इतर दोघांचा शोध सुरू होता.
पोलिस सातत्याने अजहरचे ई-सर्व्हेलन्स करत होते. बंगळुरूतदेखील एक पथक गेले होते. पोलिसांना तांत्रिक तपासाच्या आधारे अजहर नागपुरात आल्याचे कळाले. तो न्यायालयातून दिलासा मिळविण्याच्या प्रयत्नात होता व एका वकिलाशी त्याने संपर्क केला होता. अजहर न्यायालयाजवळ पोहोचला असता, हुडकेश्वर पोलिस ठाण्याचे पथकदेखील तेथे पोहोचले व अजहरला अटक केली. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अजहर हा त्याच्या जावई व बहिणीसोबतच राहायचा. तो जावई अरमानच्या व्यवसायात मदत करायचा. त्यानेदेखील १० वर्षीय मुलीवर अत्याचार केले होते. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांनी त्याच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला. तिसऱ्या आरोपीचादेखील शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अजहरची पत्नी सोडून गेली
आरोपी अजहर हा अगोदरपासूनच विकृत मनोवृत्तीचा आहे. त्याच्या स्वभावाला कंटाळून त्याची बायको त्याला सोडून निघून गेली होती. कोरोनाच्या काळात तो बहिणीकडे राहायला आला.
काय आहे प्रकरण
बंगळुरूमधील असलेले हे कुटुंब व्यवसायानिमित्त येथे स्थायिक झाले. त्यांनी तेथील एका गरीब कुटुंबातील १० वर्षीय मुलीला दोन वर्षांअगोदर नागपुरात आणले होते. तिने काही चूक केली तर अगोदर ते तिला मारहाण करायचे. तिघेही जण तिला लहानसहान चुकांवर तवा, सराटा किंवा सिगारेटचे चटके द्यायचे. अगदी तिच्या गुप्तांगाला चटके देण्यापर्यंत त्यांची मजल गेली. अरमान व अजहरने तिच्यावर लैंगिक अत्याचारदेखील केले. सर्व आरोपी लहान मुलांसह २४ ऑगस्ट रोजी बंगळुरूला गेले व जाताना मुलीला घरातील एका कोंदट खोलीत कोंडून गेले. वीज विभागाचे कर्मचारी वीज कापण्यासाठी आले. अंधार झाल्याने भेदरलेल्या मुलीने हिंमत करून खिडकीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला होता.