नागपूर : शहरातील बहुतांश कंपन्यांमध्ये मालाच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत व त्यांच्या भरवशावर व्यवस्थापन निर्धास्त असतात. मात्र एका कंपनीत कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार झाला आहे. सुरक्षारक्षक व त्याच्या मालकानेच कंपनीत चोरी करून तेथील मुद्देमाल लंपास केला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मोहन श्रीराम कांबळे (५९, मेकोसाबाग, कडबी चौक) यांची एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमरनगर येथे मोहन इंजिनिअरींग नावाची कंपनी आहे. तेथे त्यांनी सुरक्षारक्षक नेमले आहेत. ४ नोव्हेंबर रोजी रात्री कांबळे कंपनीतून घरी गेले. दुसऱ्या दिवशी कंपनीतील लोखंडी मटेरिअर, बोल्ट असे ९० हजारांचे साहित्य गायब होते. कांबळे यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दीपचंद चंदेल नावाचा सुरक्षारक्षक व त्याचा मालक अनिल चव्हाण यांनी माल चोरीला नेल्याची बाब समोर आली. कांबळे यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध सुरू आहे.