नागपूर : भारतीय संस्कृती व मानस एका भक्कम पायावर उभा आहे. आपली मते ही स्वानुभावावर आधारित ठेवण्यावर भर दिला आहे. विश्वासार्हतेला अधिक प्राधान्य आपण देत आलो आहोत. माहितीच्या या युगात विविध ॲप्स व संकेतस्थळाशी निगडीत समाजमाध्यमांवरील मत-मतांतरावर जर आपण आपली मते तयार करीत राहिल्यास आपण आपला समृद्ध वारसा हरवून तर बसत नाहीत ना, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी केले.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने कारवा या तीन दिवसीय उत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी व्हीएनआयटीचे संचालक प्रा. पी.एम. पडोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘बाईटसची लढाई : माहिती युद्धात भारताची भूमिका’ या विषयावर साध्या भाषेत त्यांनी उकल करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ब्रिजेश सिंह म्हणाले, संपू्र्ण विश्वावर एक अपूर्व छाप भारतातील गुणवत्तेने निर्माण केली आहे. आपली मातृभाषा, संस्कृतीतून चालत आलेले आकलन व ज्ञान याला ब्रिटिशांनी छेद दिला. येथील नैसर्गिक साधनसंपत्तीची व्यापाराच्या नावाखाली मोठी लुबाडणुकही केली. याहीपेक्षा त्यांनी आपल्या सोबत आणलेल्या इंग्रजी भाषेच्या माध्यमातून ज्ञान रुजविण्याचा जो प्रयत्न केला तो आव्हानात्मक ठरला.
इस्त्राईलसारखा छोटा देश लयास गेलेली आपली हिब्रू भाषा मोठ्या प्रयत्नांची शर्थ करून पुन्हा जिवंत करतो. या मातृभाषेच्या बळावर इस्त्राईलच्या हिब्रू विद्यापीठातील तब्बल ३३ व्यक्ती नोबेलने सन्मानित होतात हे आपण विसरता कामा नये. याची आठवण त्यांनी करून दिली. लोकशाही देशात प्रत्येकाच्या मताला जरूर अधिकार आहे. परंतु अभिव्यक्तीच्या नावाखाली जर ही मतमतांतरे चुकीच्या माहितीवर आधारित असतील किंवा ती जाणीवपूर्वक कुणाची फसवणूक करणारी असतील तर त्याला कायद्याच्या चौकटीत एक अटकाव असण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.