नागपूर : उमरेडच्या खदान परिसरात रविवारी रात्री पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रात हा परिसर येत असून, कोळसा खाणीकडे हा मार्ग जातो. जवळच वर्कशॉपसुद्धा आहे. कोळसा खाणीत तीन पाळीत काम चालत असते. याठिकाणी ९०० च्या आसपास कामगार आहेत.
रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास सुरक्षा कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते तर काही कामगार वाहनाने कोळसा खाणीकडे जात होते. अशातच अगदी काही फुटाच्या अंतरावर त्यांना वाघोबा आडवा झाला. वाघोबा दिसताच अनेकांची घाबरगुंडी उडाली. हा वाघ साडेतीन ते चार वर्षाचा नर असल्याचे सांगितले जात आहे. हा परिसर झाडाझुडपांनी वेढलेला, उंच टेकड्यांचा आहे. केवळ ५ किमी. अंतरावर लोहारा जंगल असल्याने या परिसरातून भटकंती करीत तो आला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. वाघोबा दर्शनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.