नागपूर : सहा दिवस होऊनही परिचारिकांच्या संपावर तोडगा निघाला नाही. मेयो, मेडिकल मधील रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. या दोन्ही रुग्णालयातील रुग्णसेवेचा भार नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर आला आहे. मेडिकलमध्ये मंगळवारी सायंकाळी ८०० वर रुग्ण भरती असताना सात परिचारिका व ४२ विद्यार्थी त्यांच्या सेवेत होते.
परिचारिकांचे ‘ आऊट सोर्सिंग ’ करू नका, त्यांची कायमस्वरूपी भरती करा, केंद्राप्रमाणे समान वेतन द्या, या मुख्य मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने २३ मे पासून आंदोलन सुरू आहे. मेयो, मेडिकलचा कणा असलेल्या परिचारिका २६ मे पासून संपावर गेल्याने दोन्ही रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित झाली. मात्र, मेया मधील जवळपास ५० टक्के परिचारिका कामावर असल्याने व त्यांच्या मदतीला जनरल नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी असल्याने रुग्णांना बरीच मदत होत आहे. परंतु मेडिकलमध्ये जवळपास ९० टक्क्यांवर परिचारिका संपावर गेल्या आहेत. मात्र आता मेडिकलच्या बीएससी नर्सिंग कॉलेजचे द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षांतील सुमारे २०० विद्यार्थी सोमवारपासून उपलब्ध झाल्याने रुग्णसेवेत त्यांची मदत होऊ लागली आहे.