नागपूर : माजी वायुसैनिक कल्याण संघटना (ईवान) नागपूरतर्फेरक्षाबंधन सणानिमित्त सीमेवरील जवानांच्या सन्मानार्थ ‘रक्षाबंधनसैनिकोंके संग’ या कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
भारताचे जवान कोणत्याही परिस्थितीत डोळ्यात तेल घालून सीमेवर देशाचे रक्षण करतात. सण उत्सवाच्या काळातही घरापासून दूर राहणाऱ्या या जवानांच्या पाठीशी समाजाने भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन ईवानने केले.
अमर जवान स्मारक परिसर, अजनी येथे आयोजित कार्यक्रमात उमंग सब एरियाचे सैनिक, एनडीएसचे जवान तसेच सरस्वती विद्यालयच्या एअरविंग एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले. माऊंट कारमेल गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी तसेच परिसरातील भगिनींनी व ईवानच्या महिला शाखेच्या सदस्यांनी या जवानांना व एनसीसी कॅडेट्सना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला.
याप्रसंगी ब्रिगेडियर सुनिल गावपांडे (सेवानिवृत्त), नेव्ही वेटरन मेनकूदळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर मरीसा ए.सी उपस्थित होते. इवानचे सचिव अजय गाढवे यांनी प्रास्ताविक केले. इवानचे संस्थापक अध्यक्ष मनोहर भातकुलकर, अध्यक्ष लक्ष्मीकांत नांदरूणकर, कार्यकारी अध्यक्ष महेश अंबोकर व ईवानचे पदाधिकारी उपस्थित होते. श्रीकांत गंगाथडे यांनी आभार मानले.