नागपूर : २५ ऑक्टाेबर राेजी म्हणजे दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी सूर्यग्रहण अनुभवता येणार आहे. हे यावर्षीचे दुसरे व शेवटचे खंडग्रास सूर्यग्रहण आहे. देशात गुजरातच्या भूज येथे सर्वाधिक १ तास ४३ मिनिटे ग्रहण अनुभवता येईल, तर काेलकात्यात सर्वात कमी १२ मिनिटे हे ग्रहण दिसेल. राज्यात सर्वात कमी गडचिराेलीत ४७ मिनिटे, तर पालघरमध्ये सर्वाधिक काळ म्हणजे १ तास २१ मिनिटे हे ग्रहण पाहता येईल. नागपुरात ५३ मिनिटांपर्यंत सूर्यग्रहण अनुभवता येईल.
दर महिन्यात अमावास्येला सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येताे; पण ते नेहमी एका रेषेत नसतात. २५ ऑक्टाेबरला ते एका रेषेत असतील; पण सूर्याचा काहीच भाग चंद्रामुळे झाकला जाईल. म्हणून याला आंशिक किंवा खंडग्रास सूर्यग्रहण म्हटले जाते. यावेळी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर ३ लाख ७८ हजार २६७ किमी, तर सूर्याचे अंतर १४ काेटी ८७ लाख ८० हजार ९३० किमी असेल. युराेप, उत्तर अमेरिका, उत्तर आफ्रिका म्हणजे उत्तर गाेलार्धात सूर्य ८० टक्के झाकला जाईल तर दक्षिण गाेलार्धात ताे कमी असेल. भारतात ईशान्येकडील राज्यवगळता सर्वत्र ग्रहण दिसेल. गुजरातमध्ये २० टक्के, महाराष्ट्रात १० टक्के व केरळात ३ टक्के ग्रहण दिसेल.
जगात आइसलॅण्डमधून भारतीय वेळेनुसार दुपारी २.२९ वाजता ग्रहणाला सुरुवात हाेईल. देशात सायंकाळी ४.२९ वाजता सूर्यग्रहण सुरू हाेईल आणि ६.१५ वाजता ते संपेल.
ग्रहण कुठे किती काळ दिसेल?
- देशात गुजरातच्या भूजमध्ये १ तास ४३ मिनिटे सर्वाधिक काळ.
- सर्वात कमी १२ मिनिटे काेलकात्यात.
- महाराष्ट्रात सर्वात कमी ४३ मिनिटे गडचिराेलीत व सर्वाधिक काळ पालघरमध्ये १ तास २१ मिनिट.
- नागपूरला ५३ मिनिटे हाेणार दर्शन
९ वर्षे करावी लागेल प्रतीक्षा
यानंतर भारतीयांना सूर्यग्रहण पाहण्यासाठी तब्बल ९ वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यानंतर २५ मे २०३१ राेजी केरळमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल, तर २० मार्च २०३४ राेजी काश्मीरमधून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दृष्टीने व सर्वसामान्यांनीही हे ग्रहण उपकरणांच्या मदतीने नक्की बघावे. अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन स्काय वाॅच ग्रुपचे अध्यक्ष व खगाेल अभ्यासक प्रा. सुरेश चाेपणे यांनी केले आहे.