नागपूर : सोबत सोडून गेलेल्या पत्नीचा विरह असह्य झाल्यामुळे सासूवर चाकू हल्ला करणाऱ्या जावयाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली व पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. तसेच, दंड न भरल्यास आरोपीला पाच महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे स्पष्ट करण्यात आले. सत्र न्यायालयाच्या न्या. एम. व्ही. देशपांडे यांनी हा निर्णय दिला.
धर्मेंद्र रामजियावन शाहू (३२) असे आरोपीचे नाव असून तो नारा येथील रहिवासी आहे. जखमी सासूचे नाव अंतकला मेश्राम (५०, रा. सदर) आहे. तिची मुलगी तृप्ती (२८) व धर्मेंद्रचे प्रेमसंबंध होते. त्यांनी २० जानेवारी २०१५ रोजी लग्न केले. त्यानंतर, धर्मेंद्रने काही दिवस तृप्तीला चांगले वागविले. पुढे त्याने खरे रंग दाखवायला सुरुवात केली. तो तृप्तीचा शारीरिक-मानसिक छळ करायला लागला.
तृप्तीला शिक्षण घ्यायचे होते, पण धर्मेंद्र तिचा विरोध करीत होता. त्यामुळे तृप्ती नोव्हेंबर-२०१७ मध्ये माहेरी निघून गेली. काही महिन्यांनी तिचा विरह धर्मेंद्रला बोचायला लागला. तो तृप्तीसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु, तृप्ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. परिणामी, धर्मेंद्र भयंकर चिडला होता. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. पंकज तपासे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा सिद्ध केला.