नागपूर : बार्टीने राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत अनुसूचित जातीतील दहावीच्या ज्या विद्यार्थ्याने ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. त्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षणाच्या पूर्व तयारीसाठी बार्टीतर्फे २ लाख रूपये देण्यात येणार होते. २०२१ साली यासंदर्भात जाहीरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु ही योजना राबवण्यातच आली नाही. ही योजना कधी सुरूच झाली नाही. अखेर आज गुरूवारी बार्टीने एक सूचना जारी करीत ही योजना बार्टीतर्फे राबविली जात नसल्याचे सूचना प्रसिद्ध केली. त्यामुळे अंमलबजावणी करण्यापूर्वीच ही योजना कायमस्वरुपी बंद झाल्याचे शिक्कामाेर्तब झाले आहे.
बार्टीतर्फे मोठा गाजावाजा करीत ही विशेष अनुदान योजना जाहीर करण्यात आली होती. दहावीच्या गरीब विद्यार्थी व पालकांना त्यामुळे मोठा आनंद झाला होता. दहावीनंतर जेईई-नीटचे कोचिंगसाठी याचा उपयोग करण्यात येणार होते. जाहिरात प्रसिद्ध होताच मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. अनेकांनी अनुदान मिळणार म्हणून आपल्या पाल्यांना मोठ्या शिकवणी वर्गात प्रवेशही करून दिले होते. परंतु नंतर त्यांची निराशा झाली. पैसे न मिळाल्याने काहींनी शिकवणी वर्गातून नाव काढले. तर काहींना आर्थिक फटका सहन केला.
त्यावेळी विद्यार्थ्यांची संख्या, बजेट आदी कारणं देत शासनातर्फे ही योजना नाकारण्यात आली. मुळात ही योजना सुरुच नव्हती. २०२१ पासून तर आतापर्यंत या योजनेची अंमलबजावणीच होऊ शकली नाही. योजना चांगली होती. त्याची अंमलबजावणी कशी करावी, याचे नियोजन न करता ही योजना राबविली जात नसल्याचे बार्टीने जाहीर करीत एकप्रकारे योजना कायमची बंद असल्याचे मान्य केले.
बार्टीची ती जाहिरात सोशल मिडियावर प्रचंड व्हायरलबार्टीने २०२१ साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेची जाहिरात प्रसिद्ध केली होती. ती जाहिरात आज तीन वर्षानंतरही सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असते. लोक एकमेकांना ती जाहिरात पाठवून आपल्या मुलांना त्याच लाभ घेण्याचे आवाहन करीत असतात. सोशल मिडियावर वारंवार व्हायरल होत असल्यामुळेच बार्टीने ही सूचना जारी केली असल्याची बाबही बार्टीच्या महासंचालकांनी मान्य केली आहे.