मंगेश व्यवहारे
नागपूर : सरकारचे काही निर्णय या देशात भटकंती करणाऱ्या समाजाच्या जगण्यावर घात करणारे ठरले आहेत. यात मुस्लीम मदारी हादेखील एक समाज आहे. मनेका गांधींनी वन्यजीव बाळगण्यावर व त्यांचे खेळ दाखविण्यावर बंदी आणली आणि या समाजाचा रोजगारच हिरावला. नागपूर शहरात कळमना रेल्वे क्रॉसिंगच्या काठावर मदारी समाजाची वस्ती आहे. जवळपास २५० झोपड्या तिथे आहेत. दोन हजारांच्या जवळपास लोक येथे राहतात. सरकारने रोजगार हिरावल्याची खंत त्यांना आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधींनी या वस्तीला माणसांची वस्ती म्हणून कधी बघितले नाही, त्यामुळे वाळीत टाकल्यासारखे जीवन ते व्यतीत करीत आहेत. सरकार स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा करतेय. नुकताच नागपूरकरांनी जी-२० चा लखलखाट अनुभवला आहे. 'मेरी माटी, मेरा देश'सारख्या उपक्रमातून मातीचे वंदन, वीरांचे वंदन, वनसंपदेचे संगोपन, सेल्फी आणि दिवेही पेटविले जात आहेत. या अमृत काळात हा मदारी उपेक्षित आहे. या वस्तीचे हाल बघितल्यावर या मदाऱ्यांच्या जगण्याचा तमाशा झाल्याचे दिसते.
'लोकमत'च्या प्रतिनिधींनी पूर्व नागपुरातील कळमना रेल्वे ट्रकच्या काठावर वसलेल्या आदिवासी प्रकाशनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मदारी वस्तीला भेट दिली. या वस्तीत सर्वच लोक मुस्लीम आहेत. त्यांची जमात मदारी आहे. वस्तीमध्ये एक ६५ ते ७० वर्षांचे वृद्ध फत्तुभाई घरासमोर खुर्चीवर बसले होते. फत्तुभाईला विचारले 'क्या करते हो, तर ते म्हणाले, 'पहले गाव गाव घुमता था, लोगों को साप, नेवले का खेल दिखाता था. २० सालसे घर में बैठा हू.
फत्तुभाई आजारी आहे. परिस्थितीमुळे औषधपाण्यावाचून जगत होते. याच वस्तीतील सय्यद असलम पन्नाशी गाठलेले. उर्दू, मराठी, हिंदी भाषा अवगत असलेले आणि साप मुंगसाचा खेळ दाखविण्यात तरबेज आपल्या कलात्मक शैलीत बोलताना म्हणाले, स्वातंत्र्याच्या ५० वर्षांत आमच्या डोक्यावरचे चिंधीचे पाल हटले आणि टिनाचे शेड आले, एवढाच आमच्या जीवनात बदल झाला. सय्यद असलमने वस्ती बघण्याचा आग्रह धरला. वस्तीच्या गल्लीबोळात सकाळची वेळ असल्याने घराघरांपुढे चुलीवर अन्न शिजत होते. चुलीतील धुरांचे लोट बाजूला करून विस्तवाचा भडका करताना फुंकर मारून मारून डोळे चोळणाऱ्या महिलांना बघून लक्षात आले की येथे 'उज्ज्वला' योजना पोहोचलेली नाही. वस्तीतील गडरचे चेंबर तुंबल्याने घरा समोरून घाणीचे लोट वाहत होते. लहान लहान मुले त्यात पाय भरवून घरात जात होते.
घाणीच्या त्रासामुळे कंटाळलेल्या एका महिलेने घरातील अवस्थाच दाखविली. शौचालयात घाण तुंबलेली होती. जमिनीला ओल सुटली होती. जुलैच्या पावसात झालेले हाल बेहाल संतप्त होऊन सांगत होती. शौचालयात तुंबलेल्या घाणीमुळे वस्तीतील महिलांना उघड्यावर जावे लागत असल्याची वेदना तिने बोलून दाखविली. कुणी रस्त्याचे झालेले बेहाल दाखविले. कुणी विजेचे आलेले भरभक्कम बिल दाखविले. घाणीमुळे घराघरात लहान मुले आजारी असल्याचे सांगितले, आम्हाला कुणी माणसेच समजत नसल्याची वेदना लोकांनी व्यक्त केली. येथील तरुण मुले व पुरुष मंडळी वस्त्यांमध्ये चादर विकून पोटापाण्याची सोय करतात. महिला व मुली घरातच असतात. कुणीही कामासाठी बाहेर जात नाही. चादर विकून आलेल्या पैशातून कुटुंबाची गुजराण करतात. लहान मुले जवळच असलेल्या महापालिकेच्या शाळेत जातात पण शिक्षणाचे बेहाल आहेत.
डिप्टी सिंग्नलमधील सरकारी दवाखानावर त्यांचे आरोग्य टिकलेले - आहे. ज्येष्ठ व महिलांना रोजगार नाही. दिवसभर वस्त्या राखण्याचे काम करतात. निरक्षरता, मागासलेपणा, अस्वच्छता हेच त्यांच्या नशिबी आले आहे. २४ वर्षीय अली सय्यद सातवीपर्यंत शिकला. त्याचे लग्न झाले असून, दोन मुले आहेत. गांधीबागेतून चादरी आणतो आणि शहरभर विकतो. आपण शिकू शकलो नाही, याची त्याला खंत आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवितो. पण दर्जेदार शिक्षणापासून मुले दूर आहेत. बऱ्याच मुलांना स्वतःचे नावही लिहिता येत नाही. पोषण आहार, गणवेश मिळतात म्हणून मुले शाळेत जातात. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. वस्तीतील सबिना शेख हिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. पुढचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे. पण परिस्थिती नाही. ती वस्तीतील मुलींना शिकविते. ४० मुली तिच्याकडे यायच्या. आता जागा नसल्याने ती वस्तीशाळाही बंद आहे. सबिना म्हणाली, येथील मुला- मुलींच्या शिक्षणाची फार वाईट अवस्था आहे.
ही पारंपरिक कला लुप्त होत आहे
सय्यद अस्लम यांनी लगेच झोपडीतून डमरू, बासरी आणि साप ठेवण्याची टोपली आणली आणि खेळ दाखवायला लागले. पोट भरण्यासाठी आमचा खरा धंदा तर साप नाग खेळवण्याचा होता. मानवी वस्तीत आलेले साप पकडायचो, त्यांना बांबूच्या बुट्टीत ठेवायचो आणि त्यांचाच खेळ करून उपजीविका करायचो. त्याच्या जोडीला थोडीफार हातचलाखी करायचो. खेळ संपल्यावर पैसापाणी मागायचो. आम्ही सापाला कधी त्रास दिला नाही. मुलासारखे त्याला सांभाळायचो. आमच्या समाजाची ही पारंपरिक कला होती. मनेका गांधी यांनी त्यावर बंदी आणल्याने आमचा रोजगारही हिरावला आणि आता कलाही लुप्त झाली आहे. आता वस्तीतील तरुण मुले चादर विकून उपजीविका करतात.
वयोवृद्धांना वेदना आहेत
वस्तीतील बाया रिकाम्या आहेत. त्यांच्या हाताला घरगुती काम मिळाले पाहिजे. वस्तीत सोयीसुविधा नाहीत. घाणीच्या विळख्यात आम्ही जगतो आहे. अनेक ज्येष्ठ महिला आहेत. त्यांच्या आजारपणासाठी सरकारी योजना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. वस्तीत प्रशासन, लोकप्रतिनिधी ढुंकूनही बघत नाही. घरात शौचालय असूनही महिलांना उघड्यावर जावे लागते. आमच्या जगण्याच्याच वेदना आहेत.
- मुमताज रफिक सय्यद, स्थानिक रहिवासी
तरुणपणी साप-मुंगसाचे खेळ दाखविण्यासाठी गावोगावी फिरणारे वस्तीतील काही लोकं वृद्ध झाले आहेत. हाताला रोजगार नसल्याने दिवसभर वस्ती राखण्याचे काम करतात. मुलांच्या भरवशावर त्यांचे जगणे आहे. आमच्यापर्यंत कधी निराधार योजना पोहोचली नाही. आम्ही कलावंत असूनही कलावंतांची पेन्शन मिळाली नाही. सरकारने आमच्यासारख्या ज्येष्ठांना साप व मुंगसाचा खेळ दाखविण्याची सूट दिल्यास आम्हाला दोन पैसे मिळतील.
- गरीबखाँ मदारी, ज्येष्ठ नागरिक