नागपूर : महाराष्ट्र सरकारने २०१८ ला केलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयात माेठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत ६० जीएसएम (ग्रॅम प्रती चाैरस मीटर) पेक्षा अधिक जाडी असलेले प्लास्टिक, पॉलीप्रॉपिलीन (नाॅन वोव्हन) पासून बनवलेल्या पिशव्या आणि ५० मायक्राॅनपेक्षा कमी आकाराच्या पॅकेजिंग उद्याेगात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला बंदीतून वगळण्यात येणार आहे. लवकरच याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक मंडळ, पर्यावरण सचिव व तज्ज्ञ समितीच्या २५ नाेव्हेंबर २०२२ राेजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. वरील प्रकारचे प्लास्टिक बंदीतून वगळण्याचा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निर्णयास पाठविण्यात आले. नुकताच मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या राज्याच्या पर्यावरण विभागाच्या बैठकीत या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे केंद्र सरकारने ऑगस्ट २०२१ मध्ये अधिसूचना जारी करून काही सूट देत देशभरात प्लास्टिक बंदी लागू केली हाेती. राज्य शासनाचा हा ठराव केंद्र सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या धोरणाशी सुसंगत असल्याचे पर्यावरण विभागाच्या वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. हा ठराव मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुढील काही दिवसांत याबाबत सुधारित अधिसूचना जारी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
उल्लेखनीय म्हणजे प्लास्टिक बंदीचा निर्णय लावणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य हाेते. राज्याच्या पर्यावरण विभागाने २३ मार्च २०१८ रोजी प्लास्टिक आणि थर्माकोलपासून बनवलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक, किरकोळ विक्री, आयात आणि वाहतुकीवर बंदी घातली होती. अर्ध्या लिटरपेक्षा कमी वाहून नेण्याची क्षमता असलेली उत्पादने आणि लहान पीईटी आणि पीईटीई बाटल्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयात सुधारणा करून नष्ट हाेण्यासारखे नाॅन ओव्हन प्लास्टिक बॅग, ६० जीएसएमपेक्षा अधिक जाडी असलेले प्लास्टिकला बंदीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निर्णय स्वागतार्ह
नाॅन वोव्हन टेक्सटाईल्स बॅग मेकर्स वेलफेअर असाेसिएशनचे अध्यक्ष ऐनाज खान व सचिव निकेतन डाेंगरे यांनी सांगितले, नाॅन वोव्हन बॅग सहन नष्ट हाेणे शक्य असून, प्लास्टिकचा सर्वाेत्तम पर्याय ठरल्या आहेत. इतर राज्यात नाॅन ओव्हन बॅगवर बंदी नसताना केवळ महाराष्ट्रात बंदी लादण्यात आली हाेती. त्यामुळे राज्य सरकारने नाॅन वोव्हनवरील बंदी हटवावी म्हणून आमचे प्रयत्न हाेते. बंदी हटविण्यात येत असल्याचे परिपत्रक आमच्याकडे आलेले नाही; पण राज्य सरकारने अशाप्रकारे निर्णय घेतला असेल तर ताे स्वागतार्ह असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.