रामटेक - सत्तेच्या खुर्चीसाठी हपापलेला विरोध पक्ष मोदी द्वेषाने पिडीत आहे. ज्यांचे आयुष्य फक्त भ्रष्टाचार, घोटाळे आणि रोकड मोजण्यात गेले त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करण्याच नैतिक अधिकार नाही. विरोधकांची अवस्था ‘अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ’ अशी केविलवाणी झाली असल्याची जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मोदींवर अनेकदा टीका करता पण त्यांची दृष्टी पडली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी उबाठा गटाला दिला. रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे आणि नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते. मोदीजींवरील प्रेमाची लाट संपूर्ण देशात आली आहे. घर घर मोदी नव्हे तर आता मना मनात मोदी असे वातावरण निर्माण झाले आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
विरोधकांनी जेव्हा जेव्हा मोदींजींवर आरोप केले, टीका केली तेव्हा जनतेने त्यांना जागा दाखवली. २०१४ मध्ये जनतेने विरोधकांना घरी बसवले. २०१९ मध्ये विरोधी पक्षासाठी आवश्यक खासदार देखील निवडून आले नाहीत. आता २०२४ मध्ये मला पूर्ण खात्री आहे की या निवडणुकीत विरोधी पक्षाला जनता घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही. साप आणि मुंगूसाची दोस्ती जनतेने ओळखली आहे, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
या लोकसभा निवडणुकीत मोदी सर्व रेकॉर्ड मोडीत काढून विजयी होतील. एनडीएकडे आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास विजयाकडे नेतो, तर अहंकार विनाशाकडे घेऊन जातो. मोदी आत्मविश्वासाने परिपूर्ण आहेत, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. २०१४ मध्ये मोदीजी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा शेअर बाजार २५००० अंकांवर होता. आज तो ७५००० अंकावर गेला आहे. देशाची आर्थिक प्रगती होत आहे. २५ कोटी लोकांना गरिबीतून वर आणले. कोरोना काळात ८० कोटी लोकांना मोफत रेशन दिले.
अन्न, वस्त्र, निवारा देणारे मोदीजी आणि राष्ट्रपतींचा अपमान करणारे कॉंग्रेस यातील फरक जनतेने ओळखला आहे. राष्ट्रपतींचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला या निवडणुकीत जनता धडा शिकवेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.