नागपूर : गेल्या आठवड्यात रत्नागिरीपर्यंत पोहोचलेले मानसूनचे ढग पुढे सरकलेच नाहीत. आता १८ ते २१ जूनपर्यंत मान्सून पुढे सरकण्याची चिन्हे आहेत. एवढेच नव्हे, तर हवामान खात्याने २० जूनपर्यंत हीटवेव्ह (उष्णतेची लाट) अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पावसाच्या सरी नव्हे, तर आग ओकणाऱ्या सूर्याचाच सामना करावा लागणार आहे.
नागपुरात शुक्रवारी कमाल तापमान सामान्यापेक्षा पाच अंशांनी जास्त म्हणजेच ४१.८ अंश से. नोदविले गेले. रात्रीचे तापमानही सामान्यापेक्षा ३ अंशांनी जास्त म्हणजे २८.८ अंश से. नोंदविण्यात आले. पारा सामान्यापेक्षा ५ अंश वर सरकला की त्याला ‘हीटवेव्ह’ श्रेणीत मोजले जाते. पुढील चार दिवस आणखी नागपूरकरांची उन्हापासून सुटका नाही.
चंद्रपूर सर्वात हॉट
- चंद्रपूर हे ४२.६ अंशासह विदर्भात सर्वाधिक गरम राहिले. बुलढाण्यात पारा ३९ अंशांवर स्थिरावला. यावर्षी एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस झाला. मे महिन्यात देखील अपेक्षेनुसार तापमान वाढले नाही. त्यामुळे जून तापत आहे. शुक्रवारी सकाळी नागपुरात आर्द्रता ३६ टक्के होती. सायंकाळी ती घटून २२ टक्क्यांवर आली.
वादळाचा मान्सूनला फटका
११ ते १६ जूनदरम्यान मान्सूनचे ढग रत्नागिरी, कोपल, पुट्टुपर्थी, श्रीहरिकोटा येथे रखडले. बिपरजॉय वादळाने हवेतील आर्द्रता शोषून घेतली. त्यामुळे आता आठवडाभर तरी मान्सूनचे ढग सक्रिय होण्यास वाट पाहावी लागेल. नागपुरात २५ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होऊ शकते.