योगेश पांडे
नागपूर : शिवसेनेमधील बंडाळीमुळे महाराष्ट्र सरकारवरच संकट आले असून, महाराष्ट्रातदेखील ‘ऑपरेशन लोटस’चा पुढचा अध्याय दिसणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पडद्यामागे अनेक गोष्टी घडत असताना सार्वजनिकरीत्या मात्र भाजप नेत्यांनी यासंदर्भात ‘वेट अँड वॉच’ची भूमिकाच घेतली असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही पदाधिकाऱ्यांशीदेखील यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपच्या प्रक्रियेत हस्तक्षेप नसला तरी मागील अनुभव लक्षात घेता भाजपने सारासार विचार करूनच पाऊल उचलावे व संयमाने परिस्थिती हाताळावी, अशी सूचना संघाकडून करण्यात आली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जवळचा फायदा पाहण्यापेक्षा दूरचे नफा-नुकसानदेखील लक्षात घ्यावे, असे सांगण्यात आले आहे.
भाजप व संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अनेकदा अनौपचारिक पद्धतीनेदेखील मोठ्या मुद्यांवर चर्चा होतात. या मुद्यावरदेखील या पद्धतीने संघधुरिणांमध्ये चर्चा झाली. संघ-भाजपमध्ये समन्वय साधणाऱ्या यंत्रणेतूनदेखील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत अद्ययावत मुद्यांचे आदानप्रदान सुरू आहे. बंडखोर आमदारांना गुवाहाटीलाच हलविण्याची सूचना अशाच चर्चेतून समोर आल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली.
सध्याची एकूण स्थिती पाहता भाजप नेत्यांनी समोर येऊन कुठलेही भाष्य करू नये व महाविकास आघाडीकडून काय पावले उचलण्यात येतात याकडे लक्ष देण्यात यावे, अशी सूचना संघ पदाधिकाऱ्यांनी केली आहे. देशात याअगोदरदेखील ‘ऑपरेशन लोटस’चे प्रयोग झाले आहेत. मात्र, महाराष्ट्रात अडीच वर्षांअगोदर भाजपला बसलेल्या धक्क्यानंतर सर्व बाबींनी अंदाज व शाश्वती लक्षात घेऊनच धोरण निश्चित करण्यात यावे, असेदेखील सुचविण्यात आले आहे. यासंदर्भात संघाकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
‘त्या’ स्वयंसेवकांचे बारीक लक्ष
यासंदर्भात संघाच्या पश्चिम क्षेत्रातील एका पदाधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी आमचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे स्पष्ट केले. संघ राजकारणात हस्तक्षेप करीत नाही व हेच धोरण कायम आहे. मात्र, राजकीय पटलावर स्वयंसेवकदेखील प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांचे या परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. ते संयमानेच पावले उचलतील, असे मत संबंधित पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.