नागपूर : तब्बल ४७ महिन्यांच्या कालावधीनंतर नागपूर महापालिकेने गणेश टेकडी उड्डाणपुलाखालील ११६ दुकाने तोडण्याला सोमवारी सुरूवात केली. प्रवर्तन विभागाच्या पथकाने २२ दुकानांचे शटर तोडले. दुसरीकडे जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात ३९ दुकानदारांनी याचिका दाखल केली आहे. यावर निर्णय होत नाही, तोपर्यंत टेकडी उड्डाणपुलाचे तोडकाम पूर्ण होणार नाही. पुलाचे बांधकाम पाडल्याशिवाय प्रस्तावित सहापदरी मार्गाचे बांधकाम पूर्ण करणे शक्य नाही. मात्र, प्रकरण न्यायालयात असले तरी उर्वरित दुकानदार दुकानांचा ताबा सोडतील, असा मनपाला विश्वास आहे.
रेल्वे स्थानकासमोर होणारी वाहतूक कोंडी विचारात घेता, मनपाने सीताबर्डी रेल्वे स्थानकासमोर उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव वर्ष २००३-०४मध्ये सभागृहात पारीत केला होता. येथे १७५ दुकाने बांधण्यात आली. २००८-०९मध्ये १६० दुकाने ३० वर्षांच्या लीजवर देण्यात आली. मात्र, या उड्डाणपुलामुळे रेल्वे स्थानकासमोरील चौकात वाहतुकीची कोंडी होत असल्याने हा उड्डाणपूल तोडून येथे सहापदरी रस्ता निर्माण करण्याचा निर्णय मनपा सभागृहाने २९ सप्टेंबर २०१८ मध्ये घेतला.
उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्यावर संबंधित दुकानदारांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. १६० दुकानदारांना नोटीस बजावण्यात आल्या. १२९ दुकानदारांनी नोटीसला उत्तर सादर केले. दुकानदारांना सुनावणीकरिता बोलाविण्यात आले. १२५ दुकानदार सुनावणीकरिता हजर झाले. यातील ४७ दुकानदारांनी नुकसानभरपाई स्वरूपात अग्रीम जमा रक्कम व्याजासह परत मागितली. दुकानदारांनी दुकानांचा १२ वर्षे वापर केला. दुकानदारांचे समाधान झाल्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होणार नसल्याची माहिती उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली. जे दुकानदार न्यायालयात गेले आहेत, त्यांना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला हवा आहे. मात्र, मनपा सभागृहात झालेल्या निर्णयानुसार मोबदला देणे शक्य आहे.
सीआरएफ निधीतून मिळाले २३४.२१ कोटी
जयस्तंभ चौक ते मानस चौक व जयस्तंभ चौक ते श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स पॉईंटवरील वाहतुकीची समस्या मार्गी लावण्यासाठी, रामझुला ते एलआयसी चौक व रिझर्व बँक चौकापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तर रामझुला ते लोहापूलपर्यंत सहापदरी रस्त्याचे काम रखडले आहे. या प्रकल्पासाठी राष्ट्रीय महामार्ग निधी (सीआरएफ)मधून २३४.२१ कोटींचा निधी मंजूर आहे. महामेट्रो हा प्रकल्प राबवित आहे. श्रीमोहिनी ते रामझुला दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम गतीने सुरू आहे.
पहिल्या दिवशी २२ दुकनांचे शटर तोडले
मनपाच्या प्रवर्तन विभाग व बाजार विभागासह महामेट्रोच्या संयुक्त पथकाने सोमवारी रेल्वे स्टेशनसमोरील टेकडी उड्डाण पुलाखालील २२ दुकानांचे शटर तोडले. महामेट्रोने उड्डाण पुलाखालील दुकानदारांसाठी एसटी महामंडळाच्या जागेवर अस्थायी संकुलाचे बांधकाम केले आहे. यातील दुकानांची सोडत काढून वाटप करण्यात आले. उड्डाण पुलाखालील ६२ दुकानदारांनी कब्जा केला आहे. यातील २२ दुकानांचे शटर तोडण्यात आले.
दुसऱ्या पथकाने लक्ष्मीनगर झोन क्षेत्रातील आठरस्ता चौक ते माटे चौक, आयटीपार्कदरम्यानची ३६ अतिक्रमणे हटविली. धरमपेठ झोन पथकाने मुंजे चौक ते झाशी राणी चौकदरम्यानच्या फूटपाथवरील अतिक्रमण हटविले. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे उपायुक्त अशोक पाटील, महसूल उपायुक्त मिलिंद मेश्राम, बाजार अधीक्षक प्रमोद वानखेडे, निरीक्षक संजय कांबळे आदींच्या नेतृत्वात करण्यात आली.
- ८१२ मीटर लांबीच्या व १०.५ मीटर रुंदीच्या या उड्डाणपुलाचे बांधकाम मनपाने १६.२३ कोटी खर्च करून केले. दुकानदारांनी अग्रीम रकमेच्या स्वरुपात ११.९६ कोटी जमा केले.
- ४४ दुकानदारांनी मोबदला घेण्याला सहमती दर्शविली. ४२ लोकांनी धनादेश घेतले. दोन जण शिल्लक आहेत.
- ७२ दुकानदारांनी दुकानांच्या बदल्यात दुकान घेण्याला सहमती दर्शविली. यातील ५७ जणांना महामेट्रोने उभारलेली दुकाने देण्यात आली.
- २५ दुकानदार जिल्हा न्यायालयात गेले असून, समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नुकसानभरपाई मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. ३४ दुकानदार उच्च न्यायालयात गेले आहेत. मात्र, १५ जणांनी दुकाने घेतली, तर १९ जणांची याचिका न्यायालयात प्रलंबित आहे.
- महामेट्रोने अजूनही १५ दुकाने खाली ठेवली आहेत. १४ दुकाने महामेट्रो पुन्हा बांधणार आहे.