नागपूर : धंतोलीतील वाईन शॉप फोडून २.८८ लाखांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या आरोपीला धंतोली पोलिसांनी सहा तासांत अटक केली. वाईन शॉपमधून मोबाईल चोरी करणे आरोपीच्या अंगलट आले अन् मोबाईलच्या लोकेशनवरून तो सहज पोलिसांच्या तावडीत सापडला.
नीलेश तुळशीराम धुर्वे (२७, मालेवाडा, गडचिरोली) असे आरोपीचे नाव आहे. तो कामाच्या शोधासाठी नागपुरात आला होता. दरम्यान धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बी. बी. जैस्वाल वाईन शॉप येथे वाईन शॉपच्या मालकाचा भाचा प्रणय जैस्वाल हा रविवारी रात्री दुकान बंद करून गेला होता. आरोपी नीलेशने वाईन शॉपच्या मागील दार तोडून आत प्रवेश केला. त्याने लॉकरमधील लॅपटॉप, मोबाईल, सीसीटीव्ही कॅमेरा आणि रोख २.२५ लाख असा एकूण २.८८ लाखाचा मुद्देमाल पळविला. या प्रकरणी वाईन शॉपचे मॅनेजर रामेश्वर भाऊराव पठाडे (५५, वैष्णव मातानगर, पिपळा रोड) यांनी धंतोली पोलिसांत तक्रार दिली होती.
पोलिसांनी वाईन शॉपमधून चोरी केलेल्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता आरोपी मालेवाडा, गडचिरोली येथे असल्याचे समजले. लगेच धंतोली ठाण्यातील दीपक चोरपगार, मारोती केंद्रे, संदिप पडवाल, संजय तिवारी, मनोज सोनुने यांचे पथक गडचिरोलीला गेले. त्यांनी आरोपीला अटक करून नागपुरात आणले. त्याच्या जवळून लॅपटॉप आणि २,३४० रुपये रोख जप्त करण्यात आले. आरोपीने इतर पैसे कोणाला दिले याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपीविरुद्ध भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर येथेही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
...........