नागपूर : काजु कंपनीतील काजुचे डब्बे आणि २.१६ लाख रुपये रोख असा एकुण २ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल पळविणाऱ्या आरोपीविरुद्ध वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मनोज सुनिल खेडकर (वय ३४, रा. जय गुरुदेवनगर, मानेवाडा) यांची वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत छत्तरपूर फार्म हाऊस रोडच्या बाजुला निधीशहा काजु कंपनी आहे. रविवारी १८ जूनला ते रात्री ८ वाजता कंपनी बंद करून घरी गेले. अज्ञात आरोपीने रात्री ८ ते सकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान कंपनीच्या मागील दाराच्या फटीतून हात टाकून दाराची कडी काढून कंपनीत प्रवेश केला. आरोपीने कंपनीतील ८० किलो काजुचे ८ टब्बे व टेबलच्या ड्रॉवरमधून रोख २ लाख १६ हजार असा एकुण २ लाख ७६ हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला.
या प्रकरणी खेडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा ठाण्याचे उपनिरीक्षक रविंद्र चव्हाण यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४६१, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे. काजु कंपनीत सीसीटीव्ही कॅमेरा आहे. मात्र, चोरट्याने सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेल्यामुळे ही घटना सीसीटीव्हीत कैद होऊ शकली नाही.