नागपूर : चोरी करताना एका महिलेने स्कार्प बांधल्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता. केवळ तिच्या मनगटाला बांधलेला धागा आणि तिची चालण्याची पद्धत एवढ्याच पुराव्यावरून लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या महिलेचा छडा लावून तिला अटक केली आहे.
प्रिया मानकर (ब्राह्मणी, उमरेड), असे आरोपी महिलेचे नाव आहे. आठवडाभरापूर्वी प्रीती नंदेश्वर ही महिला नागभीडवरून चंद्रपूरला जात होत्या. त्या गोंदिया ते बल्लारशा या रेल्वेगाडीत बसल्या. प्रियाही याच गाडीत चढली. तिने प्रवासादरम्यान प्रीती यांची पर्स चोरी केली. पर्समध्ये ७० हजारांची सोन्याची चेन, ४० हजारांची चपलाकंठी, असा १.१० लाखांचा ऐवज होता. दागिने चोरीला गेल्याची तक्रार प्रीती यांनी लोहमार्ग पोलिसांत दिली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना एक महिला चोरी करताना दिसली; परंतु स्कार्फ बांधल्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता. केवळ तिच्या हाताला धागा बांधलेला होता, तसेच तिच्या पायात जोडवे होते. तिला गाडीतून उतरून चालताना पोलिसांनी सीसीटीव्हीत पाहिले; परंतु एवढ्या पुराव्यावरून त्या महिलेस कशी अटक करावी, असा प्रश्न पोलिसांना पडला.
तरीसुद्धा स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र मानकर, सुरेश लाचलवार, विनोद खोब्रागडे, अविन गजवे, नलिनी भनारकर, गिरीश राऊत, मंगेश तितरमारे यांनी तपास सुरू केला. या महिलेच्या हातातील धागा, पायातील जोडवे आणि तिची चालण्याची पद्धत यावरून तिची ओळख पटवून तिला अटक करण्यात आली. तिच्याकडून १.१० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीचे लोहमार्ग पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी कौतुक केले आहे.
............