नागपूर :जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्यासह माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व काँग्रेसच्या महिला सदस्य उमरेड कऱ्हांडल्यात जंगल सफारी करीत असताना कऱ्हांडल्यातील वाघाने त्यांच्या जिप्सीचा पाठलाग केला. गाईडच्या सतर्कतेमुळे कुठलीही विपरित घटना घडली नाही. पण बरेच अंतर वाघ पाठलाग करीत असल्यामुळे महिला सदस्यांची घाबरगुंडी उडाली होती, असे व्हायरल झालेल्या व्हिडीओत आलेल्या आवाजावरून नक्कीच समजते.
जिल्हा परिषदेच्या सभापतीची निवडणूक १ नोव्हेंबर रोजी आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या बंडखोरीमुळे काँग्रेसचे सर्व सदस्य एकत्र राहावे म्हणून काँग्रेसच्या सदस्यांसाठी उमरेड कऱ्हांडल्यात जंगल सफारी शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती.
तीन खुल्या जप्सीमध्ये महिला सदस्य सफारीला निघाल्या. एका जिप्सीमध्ये अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांच्यासह सभापती नेमावली माटे व इतर महिला सदस्य होत्या. एका जिप्सीत उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्यासह माजी अध्यक्ष रश्मी बर्वे, माजी उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, अवंतिका लेकुरवाळे व इतर सदस्य व एक लहान मुलगीही होती. तर तिसऱ्या जिप्सीमध्ये शांता कुमरे, अर्चना भोयर यांच्यासह काही महिला सदस्य होत्या.
सफारीदरम्यान त्यांना वाघ दिसला. सदस्यांनी वाहने थांबवून वाघाचे दर्शन घेत असताना, त्याने वाहनांचा पाठलाग सुरू केला. बरेच अंतर वाघाचा पाठलाग सुरू होता. दरम्यान, महिला सदस्यांनी त्याचा व्हिडीओही घेतला. हा व्हिडीओ व्हायरल झाला. यात व्हिडीओमध्ये महिला सदस्य व गाईडचा घाबरल्यासारखा आवाज येत आहे.
- थेट गाठले नील फार्म
उमरेड कऱ्हांडल्यानंतर सदस्यांचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीचाही प्लॅन होता. पण उमरेड कऱ्हांडल्यातच त्यांना वाघ दिसल्याने आणि वाघाने बराच वेळ महिला सदस्यांचा पाठलाग केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने महिलांची सुरक्षा लक्षात घेता सर्व सदस्यांना कळमेश्वरातील नील फार्ममध्ये निवाऱ्यास ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.