नागपूर: आपल्या वाहनाच्या नंबरप्लेटकडे इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा बन्याच जणांचा कल असतो. लक्ष वेधून घेणारा 'फॅन्सी नंबर जेवढा आकर्षक तेवढी पत मोठी, असा अनेकांचा समज असतो. या आकर्षक नंबरांची 'क्रेझ' पाहता पुन्हा एकदा परिवहन विभागाने आवडीच्या नंबरच्या शुल्कात दुप्पट वाढ केली. यामुळे शौकिनांच्या खिशाला अधिकची कात्री लागणार आहे.
वाहनांना आकर्षक नंबर देण्याचे 'फेड' नवे नाही. गाडीला ठराविक नंबर मिळावा, यासाठी आग्रही असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही बाब प्रादेशिक परिवहन विभागाने आपल्या पथ्यावर पाडून घेत २०१३ मध्ये 'फैन्सी' नंबरच्या शुल्कात तीन ते चार पट वाढ केली. जो 'एक' नंबर एक लाख रुपयांचा होता तो मोठ्या शहरात चार लाखांचा तर छोट्या शहरात तीन लाखांचा केला. आकर्षक नंबर महागल्याने वाहनधारक याकडे पाठ फिरवतील असा काहींचा समज होता. मात्र, २०२२-२३ मध्ये या 'फॅन्सी' नंबरमधून एकट्या ग्रामीण आरटीओला तब्बल ४ कोटी ३१ लाख ५६ हजार ५०० रुपयांचा महसूल मिळाला. हौसेला मोल नसल्याचे यातून दिसून आले. आता पुन्हा ३० ऑगस्टपासून 'फॅन्सी' नंबरचे दर वाढविण्यात आल्याची अधिसूचना गृह विभागाने काढली.
आधी किमान ७ हजार ५०० लागायचे
मालिकेतील शेवटच्या क्रमांकापासून १ हजार पेक्षा अधिक असलेल्या कोणत्याही क्रमांकासाठी पूर्वी अतिरिक्त शुल्क ७ हजार ५०० रुपये आकारले जायचे. आता त्याची किंमत वाढवून १५ हजार रुपये करण्यात आली.
दुचाकीच्या 'फॅन्सी नंबर'मध्येही भरमसाठ वाढ
कारसोबतच दुचाकी वाहनांच्या 'फॅन्सी' नंबरमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. पूर्वी दुचाकीसाठी ०००१ नंबर हा ५० हजारांचा होता आता या नंबरसाठी एक लाख रुपये मोजावे लागणार आहे. दुचाकी एवढीच फॅन्सी नंबरची जवळपास किंमत झाल्याने या नंबरला ग्राहक मिळतात की नाही, याकडे आरटीओचेही लक्ष लागले आहे.
नऊ वर्षांनंतर वाढ
परिवहन विभागाने २०१३ मध्ये व्हीआयपी नंबरच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नागपूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये चारचाकी वाहनांसाठी ०००१ हा नंबर चार लाखांचा तर, इतर जिल्ह्यांमध्ये याच नंबरला तीन लाख रुपये शुल्क केले. आता पुन्हा या नंबरसाठी या नऊ जिल्ह्यांमध्ये हाच नंबर सहा लाखांचा तर इतर जिल्ह्यासाठी हा नंबर पाच लाखांचा करण्यात आला आहे.