नागपूर : ऑनलाईन खरेदी-विक्रीचे प्रमाण वाढले असताना फसवणुकीचे वेेगवेगळे फंडदेखील वापरण्यात येत आहे. अनेकदा लोक संबंधित उत्पादनांचे ‘रिव्ह्यू-रेटिंग’ पाहून खरेदी करतात. मात्र खोटे ‘रिव्ह्यू’ व ‘रेटिंग’ टाकून ग्राहकांची दिशाभूल करण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. विशेष म्हणजे यासाठी अनेक एजन्सीजला कंत्राटदेखील दिले जातात, अशी माहिती सायबर तज्ज्ञांनी दिली आहे.
सध्या सर्वत्र ऑनलाईन खरेदीवर जास्त भर असतो व त्यामुळे ‘रिव्ह्यू-रेटिंग’ला जास्त महत्त्व आले आहे. ही बाब लक्षात घेऊन अनेक कंपन्या ग्राहकांना उत्पादनांबाबत ‘रिव्ह्यू-रेटिंग’ मागतात. मात्र एखाद्या उत्पादन किंवा प्रतिस्पर्धी कंपनीचा खप कमी व्हावा किंवा आपल्या उत्पादनांची विक्री वाढावी यासाठी चुकीचे ‘रिव्ह्यू-रेटिंग’ देण्याचे प्रकार सुरू झाले आहे. यासाठी थेट ‘सायबर सुपारी’ दिली जाते. यात ग्राहकांचे नुकसानच नव्हे तर फसवणूक होण्याची शक्यता आहे.
‘पेड रिव्ह्यू’ ठरू शकतात धोकादायकअनेकदा ग्राहकांकडून चांगले ‘रिव्ह्यू-रेटिंग’ मिळवण्यासाठी उत्पादनासोबतच कॉम्प्लिमेंटरी गिफ्टही दिले जाते. यातून अनेकजण चांगले रिव्यू व रेटिंग टाकतात. याशिवाय पैसे देऊन ‘रिव्ह्यू-रेटिंग’देण्याचेदेखील प्रकार होत आहेत. या पेड ‘रिव्ह्यू-रेटिंग’चा मोठा बाजार उदयास येत असून सामान्य नागरिकांचीच यातून फसवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर घरबसल्या काम करून पैसे कमवा, पार्ट टाईम पैसे कमवा, असे मॅसेज दिसतात. या कामात बरेचदा पेड व फेक कस्टमर ‘रिव्ह्यू-रेटिंग’ देण्याची जबाबदारी संबंधितांवर असते. त्यामुळे ग्राहकांनी जास्त सजग राहणे गरजेचे आहे, असे मत सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केले.