उमरेड (नागपूर) : लग्नाचे वऱ्हाडी घेऊन निघालेल्या ट्रॅव्हल्सचा अचानक टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली ट्रॅव्हल्स उलटली. त्यात ३५ वऱ्हाडी महिला जखमी झाल्या. यापैकी १२ ते १५ जणींना गंभीर दुखापत झाली असून, मकरधोकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचाराअंती त्यांना तातडीने नागपूरला रवाना करण्यात आले. अपघाताची ही घटना आज (दि.२८) सकाळी १० च्या सुमारास उमरेड-बुटीबोरी मार्गावरील मकरधोकडा शिवारात दत्तमंदिर परिसरात घडली. ट्रॅव्हल्समध्ये ४० ते ४५ वऱ्हाडी होते.
हिंगणा तालुक्यातील मांडवा (मारवाडी) येथील विकास रामदास हजारे यांचा विवाहसोहळा गुरुवारी भिवापूर तालुक्यातील वणी (नांद) येथे होता. दोन ट्रॅव्हल्स, एक चारचाकी वाहनासह वऱ्हाडी बुटीबोरी मार्गाने मकरधोकडा आणि त्यानंतर उमरेड येथून वणी (नांद)ला लग्नस्थळी पोहोचणार होते. सर्वच वाहने पाठोपाठ असताना मकरधोकडा शिवारातील दत्त मंदिरालगत ट्रॅव्हल्सचा डावीकडील पुढील टायर फुटला. वाहनचालकाने संतुलन ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, तरीही ट्रॅव्हल्स उलटली. मोठा आवाज झाल्याने गावकऱ्यांसह अन्य वऱ्हाडीसुद्धा धावले.
अपघातानंतर काही काळ बचावासाठी धावाधाव, आरडाओरड आणि ट्रॅव्हल्सच्या बाहेर पडण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू झाली होती. जखमींना बाहेर काढण्यासाठी ट्रॅव्हल्सच्या काचासुद्धा फोडण्यात आल्या. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी या अपघातात झाली नाही. शिवाय घटनास्थळाचे ठिकाण हे उंचीवर असून, अगदी मकरधोकडा तलावालगतच हा मार्ग आहे. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समध्ये महिला प्रवास करीत होत्या, तर अन्य दुसऱ्या ट्रॅव्हल्समध्ये पुरुष प्रवासी होते.
जखमींना नागपूरला रवाना
या अपघातात १२ ते १५ जण गंभीर जखमी झाले. यामध्ये मंगला लीलाधर श्रीरामे, आशा गुड्डू धारणे, कविता किशोर दडमल, स्वाती हरेश्वर हजारे, सविता राजाराम चौधरी, मनीषा शुभम गुळदे, बेबीबाई तेजराम नागोसा, उषा प्रकाश नारनवरे, क्रिश मंगेश बोहरे, वेणुबाई दशरथ ढोक, खुशाली प्रभाकर मारबते, रेखा सुधाकर बोहरे यांचा समावेश असून, त्यांना उपचारार्थ नागपूरला रवाना केले गेले. अन्य जखमींवर मकरधाेकडा आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. यात अलका धनराज घोडमारे, योगिता उमेश काटकर, पुष्पा प्रभाकर घरत, रत्नमाला महादेव मगरे, विमल शंकर दडमल, यमुना हिरामण चौधरी, शोभा भीमराव गायकवाड, सरस्वती शामराव हजारे, मिदाबाई गोविंद भोदणे, पुष्पा बळिराम बोहरे, उषा हिरामण जांभुळे, रेखा बंडू चौधरी, रत्नमाला महादेव मगरे, दीपिका श्रीराम लोणारे, सविता चंद्रशेखर रंदयी, जानका मारोती राणे, कुंदा शेषराव गजभिये, दुर्गा सुरेश चौधरी, पूर्वा लीलाधर श्रीरामे, गीता झिबल धारणे, लीला वासुदेव सेरझे यांचा समावेश आहे.शिबिर होते म्हणून...
मकरधोकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी शस्त्रक्रिया शिबिर होते. यामुळे याठिकाणी डॉक्टर, परिचारिका यांची चमू हजर होती. त्यामुळे जखमींवर वेळीच औषधोपचार झाले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पंधरे यांच्यासह विधिषा धनविजय, सुशीला मानकर, तृप्ती गिल्लुरकर, संगीता बिहारी, ज्योती धनगर, जितेंद्र अनकर, संदेश सावरकर व पल्लवी जुमडे, आदींनी औषधोपचार केले.