योगेश पांडे
नागपूर : जगासमोर विविध संकटे असताना कुटुंबव्यवस्थेकडे होत असलेल्या दुर्लक्षातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. भारतीय कुटुंबव्यवस्था ही एकत्र कुटुंबपद्धतीवर आधारित आहे व ही व्यवस्था जगात सर्वोत्कृष्ट आहे. जगभरात वाढत असलेला ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा ‘ट्रेन्ड’ घातक असून एकत्र कुटुंबपद्धतीच्या ऱ्हासामध्ये अनेक समस्यांचे मूळ आहे. त्यामुळे या कुटुंबपद्धतीच्या संस्कारांचा जगभरात प्रचार-प्रसार व्हायला हवा. तसेच भविष्यातील आव्हाने लक्षात घेता सरकारी यंत्रणांनादेखील यासाठी पुढाकार घ्यायला हवे, असे मत ‘युनायटेड नेशन्स वूमेन्स एम्पॉवरमेंट’च्या प्रमुख मेग जोन्स यांनी व्यक्त केले. ‘सी-२० समिट’साठी नागपुरात आल्या असता मूळच्या ऑस्ट्रेलियन असलेल्या जोन्स यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
पती-पत्नी व मुलेच कुटुंबात असताना अनेक समस्या निर्माण होतात. मुले किंवा ज्येष्ठ नागरिक असेल तर महिलांना घरी थांबावे लागते. यातून त्यांच्या हक्काच्या व प्रगतीच्या अनेक संधी हातातून निघून जातात. याचा फटका महिला सक्षमीकरणाला बसतो. त्यामुळे सरकारी यंत्रणांनी अशा कुटुंबांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’वर आधारित रोजगार निर्मितीवर भर द्यायला हवा, असे त्यांनी प्रतिपादन केले.
महिलांबाबत भारतीय सरकारचे धोरण कौतुकास्पद
जगातील अनेक देशांमध्ये महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली केवळ कागद काळेपांढरे करण्यात येत आहेत. मात्र, भारत सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू करून प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर दिला आहे. विशेषत: महिलांसाठी असलेल्या सरकारी योजना व व्यवसायाशी निगडित प्रक्रियांची माहिती गावातील महिलांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. १३५ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात महिला प्रशिक्षणासाठी सरकार पुढाकार घेत आहे व यापासून तर ऑस्ट्रेलियासारख्या इतर देशांनीदेखील शिकण्याची आवश्यकता आहे, असे मत मेग जोन्स यांनी व्यक्त केले.
मंत्री व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित व्हायला हवी
महिला सक्षमीकरणाच्या योजनांबाबत जगातील अनेक देश उदासीन आहेत. तेथे योजनांची अंमलबजावणीच होत नाही. जगभरात महिलांच्या योजनांची जबाबदारी निश्चित होत नसेल तर संबंधित मंत्रालय, तेथील अधिकारी व मंत्री यांची जबाबदारी निश्चित करायला हवी. जर योजना गरजूंपर्यंत पोहोचलीच नाही तर यंत्रणेतील या लोकांना जबाबदार धरायला हवे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आणखी काय म्हणाल्या जोन्स
- भारतातील महिलांमध्ये प्रचंड कलात्मकता असून त्या भरवशावर त्या चांगल्या व्यवसाय करू शकतात.
- भारतीय सरकार मागील चुकांपासून शिकत आहे.
- महिलांचे रोजगारक्षेत्र केवळ पर्यटन, शिक्षण व रेस्टॉरंटपुरते मर्यादित नाही.
साडीत लावली ‘सी-२०’ला उपस्थिती
मेग जोन्स या भारतीय संस्कृतीपासून प्रचंड प्रभावित झाल्या असून त्यांचा भारतीय महिलांवर चांगला अभ्यास आहे. ‘सी-२०’ला त्यांनी चक्क गुलाबी साडीत उपस्थिती लावली व त्या हिंदी बोलण्याचादेखील प्रयत्न करताना दिसून आल्या.