नागपूर : सद्य:स्थितीत संपूर्ण जग हे एका संकटाच्या स्थितीतून जात आहे. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्राची भूमिका महत्त्वाची ठरते. संयुक्त राष्ट्राने भेदभावाचे धोरण बाजूला सारत जास्त सर्वसमावेशक आणि गतिमान होण्याची गरज आहे. सोबतच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्याचीही आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले. ‘जी-२०’अंतर्गत नागपुरात आयोजित ‘सी-२०’ समिटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
भारतात विविध प्रकारच्या शंभर समस्या असल्या तरी १० लाख उपायांचे माहेरघरदेखील हीच भूमी आहे. ‘सी-२०’चा गाभा हा अध्यात्माशी जुळला असून, याचे कुठल्याही धर्माशी काहीच घेणेदेणे नाही. ‘सी-२०’मधील प्रतिनिधी हे लोकशाहीचे वाहक आहेत. ‘एक जग, एक कुटुंब’ ही संकल्पना प्रत्यक्षात येणे गरजेचे आहे. मात्र, यासाठी मोठ्या राष्ट्रांनी आडमुठे धोरण सोडण्याची गरज आहे. ‘जी-७’ राष्ट्रांकडून गरीब व अविकसित देशांना कोरोनानंतर मदत व्हावी, यासाठी ११ ट्रिलीयन डॉलर्सचा निधी उभारण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात गरजू, गरीब देशांना यातील अवघा ०.१३ टक्के निधीच देण्यात आला. जगातील देशांनी त्यांच्या सैन्यावरील १० दिवसांचा खर्च कमी केला असता तर याहून अधिक निधी गोळा झाला असता. ‘एक जग, एक कुटुंब’ असे नारे देत असताना जगात सुरू असलेला हा आर्थिक, राजकीय अन्याय दूर व्हायला हवा. अशा स्थितीत जगाच्या नजरा भारताकडे आहेत. दया आणि करुणेचा दृष्टिकोन असलेल्या भारताने ग्लोबलायझेशनचे नेतृत्व करायला हवे, असे आवाहन यावेळी सत्यार्थी यांनी केले.