नागपूर : विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल निर्धारित कालावधीत लागण्यासाठी; तसेच उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन योग्य पद्धतीने होण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठाच्या वतीने मंगळवारी प्राध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तीत शिक्षकांवर मूल्यांकनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी असते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविशंकर मोर यांची उपस्थिती होती.
उन्हाळी परीक्षांचे मूल्यांकन गुणात्मक दृष्टीने उत्तम व्हावे, यासाठी विधी महाविद्यालयात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. दुधे यांनी दिली. मूल्यांकन करीत असताना शिक्षकांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यामुळे मूल्यांकनाची जबाबदारी सुरळीतपणे पार पाडण्यास मदत मिळेल असेही डॉ. दुधे म्हणाले. डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी मार्गदर्शन करताना विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थित आणि सुरळीत होण्याकरिता प्राध्यापकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. सोबतच याविषयी अधिक माहिती दिली. आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू यांनी मूल्यांकन करताना विद्यार्थ्यांनी केलेले परिश्रम शिक्षकांनी लक्षात घेतले पाहिजे, असे सांगितले. कार्यशाळेचे प्रास्ताविक व आभार व्यक्त करताना विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविशंकर मोर यांनी विद्यार्थी हा केंद्रस्थानी असल्याने त्यांचेही हित जोपासले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. मूल्यांकन कार्यशाळेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची संलग्नित सर्वच विधी महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शिक्षकगण उपस्थित होते.