नागपूर: वाजत गाजत लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावर दुसऱ्याच दिवशी कारचा अपघात झाला. टोलनाक्याजवळच मागून आलेल्या कारने दुसऱ्या कारला धडक दिली. विशेष म्हणजे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ठिकाणी लोकार्पण केले, त्याच्या नजीकच हा अपघात झाला. सुदैवाने अपघातात कुणीही जखमी झाले नाही. दोन्ही कारचालकांनी सामोपचाराने तोडगा काढला व त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल झाली नाही.
समृद्धी महामार्गावरीलनागपूर ते शिर्डी यादरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या मार्गामुळे कमी वेळ व कमी इंधनात प्रवास करणे शक्य झाले आहे. या मार्गावरून प्रवास करण्यासंदर्भात अनेकांमध्ये उत्सुकता आहे व अनेक जण सोमवारी शिर्डी-औरंगाबादच्या दिशेने या मार्गाचा अनुभव करण्यासाठी निघाले.
समृद्धीचा ‘एन्ट्री पॉईन्ट’ असलेल्या वायफळ टोलनाक्यावजळच सोमवारी अपघात झाला. एक कार टोलनाक्याजवळ कमी गतीने जात असताना असताना मागून नागपुरचीच एक कार वेगात आली. कारचालकाने करकचून ब्रेक दाबले, मात्र त्याचे नियंत्रण राहिले नाही व समोरील कारवर जाऊन धडकला. त्यावेळी टोलवर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी कारकडे धाव घेतली. या अपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले. विशेषत: धडक देणाऱ्या कारचा समोरचा उजव्या बाजूचा भाग छिन्नविछिन्न झाला होता.
सुदैवाने दोन्ही कारमधील एकही जण जखमी झाला नाही. कर्मचाऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार करण्याचा समोरील कारचालकाला सल्ला दिला. मात्र दोन्ही कारचालकांनी एकमेकांसोबत चर्चा केली व सामोपचाराची भूमिका घेतली. यादरम्यान, हिंगणा पोलीस ठाण्यात ही माहिती कळाली होती. परंतु तक्रार नसल्याने पोलीस परतले. स्टेशन डायरीत मात्र याची नोंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल काळे यांनी दिली.