कोराडी (नागपूर) : अश्विन मासातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवसापासून देशभरात शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. मध्य भारताची आराध्य असलेल्या कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता संस्थानाही नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. पहाटे ४ वाजता जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या हस्ते श्रृंगार आरतीने देवीच्या जागरणास प्रारंभ झाला असून, नवरात्राच्या पहिल्या दिवशीच्या देवीच्या स्वयंभू दर्शनासाठी पहाटे ३ वाजल्यापासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पहाटेपासून ते उत्तररात्रीपर्यंत जवळपास अडीच लाख भाविकांनी श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे दर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे.
कोराडी देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळीच सहपरिवार दर्शन घेतले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही देवीचे दर्शन घेतले. संध्याकाळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते सामूहिक अखंड मनोकामना ज्योतींचे प्रज्वलन करण्यात आले. यावेळी सचिव दत्तू समरीतकर, केशवमहाराज फुलझले, नंदू बजाज, प्रेमलाल पटेल, सरपंच नरेंद्र धानोले, नगराध्यक्ष राजेश रंगारी उपस्थित होते. केशव महाराज, रामदास महाराज, अशोक महाराज, राजू महाराज, दिगंबर महाराज यांनी पौरोहित्य केले. मातेचा गाभारा फुलांनी सजविण्यात आला होता.
चार हजार अखंड मनोकामना ज्योत
- देवस्थानाच्या उजव्या दिशेला असलेल्या खुल्या सभागृहात चार हजार अखंड मनोकामना ज्योतींचे प्रज्वलन करण्यात आले आहे. यंदा प्रथमच आजीवन अखंड मनोकामना ज्योत, तसेच वार्षिक अखंड मनोकामना ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. यासाठी प्रथमच मातीचे मडके वापरण्यात आले आहे. मातेच्या गाभाऱ्यापर्यंत दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवेशद्वार क्रमांक दोनमधून शंभर रुपये प्रति व्यक्ती दर्शन शुल्क स्विकारले जात असून, प्रवेशद्वार क्रमांक तीनमधून विशिष्ट व अतिविशिष्ट व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे.
पंढरपूरचे विशेष सुरक्षारक्षक
- संस्थांनच्या वतीने भाविकांना मातेचे दर्शन व्यवस्थित करता यावे आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशिष्ट प्रशिक्षण घेतलेले पंढरपूर येथील सुरक्षारक्षक बोलावण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीला संस्थानचे सेवकही आहेत. सुरक्षा व्यवस्थेसाठी पाचशे पोलिस व ५० होमगार्ड्स तैनात आहेत.