योगेश पांडे नागपूर : बारमध्ये गेल्यावर पाणी उशीरा आणण्याच्या कारणावरून वेटरला झापड मारणे एका तरुणाला चांगलेच भोवले. या कारणावरून झालेल्या वादानंतर चार आरोपींनी तरुणावर हल्ला करत बाटलीने वार करून त्याला जखमी केले. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
१५ मे रोजी मध्यरात्रीनंतर कुलदीप अरविंद शुक्ला (१९, आंबेडकरनगर) हा सुमीत उर्फ मण्या योगेश नारनवरे (२५, कंटोलवाडी) व इतर दोन मित्रांसह गझल बारमध्ये दारू पित होते. सुमीतने वेटरला पाणी आणण्यास सांगितले. वेटरने पाणी उशीरा आणल्याने सुमीत संतापला व त्याने वेटरला झापड मारली. यावरून बाजुच्या टेबलवर बसलेले शुभम ज्ञानदेव वरखेडे (२७, प्रेरणा कॉलनी), सुशांत लिलाधर धकाते (३३, प्रेरणा कॉलनी), गौरव रामलाल बडीये (३०, काटोल नाका) व कमलेश चंद्रसेन ठाकरे (२७, गंगानगर) यांचा सुमितशी वाद झाला.
कुलदीप, सुमीत व त्यांचे मित्र बाहेर निघाल्यावर आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. त्यांनी सुमितला मारहाण केली व त्याच्या डोक्यावर काचेची बॉटल मारून त्याला गंभीर जखमी केले. यानंतर आरोपी तेथून फरार झाले. सुमीतच्या मित्रांनी त्याला एका रुग्णालयात नेले. कुलदीपने दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.