नागपूर : भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या विधानामागे ‘आरएसएस’च्या संस्था खोक्यातून उभ्या झाल्या, हा त्यामागील इशारा होता, तो समजून घ्या. यामुळेच चंद्रकांत पाटील यांचा जाहीर सत्कार करायचा आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले.
महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या इशारा महामोर्चाने मंगळवारी विधिमंडळावर धडक दिली. पोलिसांनी मॉरेस कॉलेज टी पॉइंटवर हा मोर्चा अडविल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. त्यावेळी ते मोर्चेकरांना संबोधित करीत होते.
आंबेडकर म्हणाले, एवढे दिवस चंद्रकांत पाटील यांच्या मनात हे खदखदत होते. अखेर खरे काय ते त्यांच्या तोंडात आले. यासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे. आंबेडकर सरकारवर निशाणा साधत म्हणाले, हे सरकार लोकांच्या प्रश्नांमध्ये न गुंतता स्वत:च्याच प्रश्नांमध्ये गुंतले आहे.
-काय खरं काय खोटं, हे सरकार सांगत नाही
आंबेडकर म्हणाले, आपल्यातून अचानक निघून गेलेल्या व्यक्तींच्या नावावरून राजकारण सुरू आहे. त्या कशा गेल्या यावरून वाद सुरू आहे. दुर्दैवाने केंद्र शासनाच्या संस्था त्यात तपास करत आहेत. हे सरकारही काय खरं, काय खोटं हे सांगायला तयार नाही. प्रामाणिक सरकार असते आणि ज्यामध्ये थोडीशी माणुसकी शिल्लक असती तर त्यांनी डॉक्टरांचा आणि पोलिसांचा अहवाल समोर आणला असता. टीव्हीवरून सुरु असलेल्या तर्कहीन चर्चा थांबल्या असत्या.
-सत्ता म्हणजे अमरपट्टा नाही
सत्ता पाच वर्षांसाठी राहते. परंतु आमच्या शिवाय कोणीच राज्य करू शकत नाही, असे सातत्याने बिंबवून सत्तेला अमरपट्टा करण्याचे काम सुरू आहे. अशांचा आपणच विचार करायला हवा. लोकशाही धोक्यात आली आहे.
-सरकार शिंदे चालवतात की फडणवीस?
पूर्वी आंदोलन करताना सत्ताधारी चर्चेला बोलवत असत. पण आताचे सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालवतात की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवतात हेच कळत नाही. पूर्वी आम्ही फक्त मुख्यमंत्र्याकडेच जायचो.आता आम्हाला एक प्रश्न दोन माणसांकडे घेऊन जावा लागतो. त्यातही उपमुख्यमंत्री हा शब्द वापरला तर तुमचे काम झाले नाही म्हणून समजा, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.