विशाल महाकाळकर
नागपूर : लहानपणापासून संघर्ष त्याच्या पाचवीलाच पूजलेला. उन्हातान्हाची पर्वा न करता दिवसभर सायकलरिक्षा चालवून दोन वेळच्या भाकरीची कशीबशी सोय होत होती. परंतु कोरोनाच्या संकट ओढवले अन् त्याच्या पोटावरच पाय पडला. सवारी भेटेना आणि मन गैरप्रकार करण्यासाठी धजेना. अखेर त्याने ‘आयडियाची कल्पना’ लढविली आणि नर्सरीचालकांना गटरातील पाणी काढून विकण्यास सुरुवात केली. वयोमानानुसार हातपाय थकले असले तरी यामुळे त्याची आजीविका कशीबशी सुरू आहे. परिस्थितीसमोर मी झुकणार नाही व शक्य असेल तोपर्यंत कष्ट करणार, ही त्याची भूमिका अनेकांना बळ देणारी आहे.
लखन असे या रिक्षावाल्याचे नाव असून मागील अनेक वर्षांपासून तो रिक्षा चालवूनच कमाई करतो आहे. मागील अनेक वर्षांपासून सायकलरिक्षांची क्रेझ कमी झाली असून दिवसाला एखादी सवारीदेखील मिळणे कठीण जाते. अशा स्थितीतदेखील मिळेल त्या पैशात तो आयुष्याची गुजराण करत होता. परंतु कोरोनामुळे फटका बसला. त्याच्या काही सहकाऱ्यांनी चोऱ्याही सुरू केल्या. मात्र याचे मन चुकीचे प्रकार करायला मानत नव्हते.
असे काम करण्यात गैर काय?
शहरातील विविध नर्सरीचालकांना पाण्याची आवश्यकता असते, परंतु चांगले पाणी त्यांना मिळत नाही. ही बाब त्याच्या लक्षात आल्याने त्याने गडरमधील पाणी नर्सरीचालकांना विकण्यास सुरुवात केली. यासाठी तो स्वत: गटरात उतरतो व कॅन भरून ते पाणी नियमितपणे नर्सरीचालकांना पोहोचवितो. विशेष म्हणजे असे करत असताना गटरला कुठलेही नुकसान होणार नाही याची तो पूर्ण काळजी घेतो.
माझ्या या कामावर लोक मला अनेकदा हसतात, चेष्टा करतात. असे करण्यात आरोग्याचा धोका आहे याची कल्पना आहे. मात्र माझ्यासाठी माझे व कुटुंबाचे पोट भरणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. वाईट मार्गाने पैसे कमविण्यापेक्षा असे काम करण्यात गैर काहीच नाही, असे सांगताना त्याच्या डोळ्यांतील पाणी बरेच काही सांगून जाते.