नागपूर : क्रेनचे चाक अंगावरून गेल्यामुळे एक ५० वर्ष वयाची अनोळखी महिला जागीच ठार झाली. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी २४ जूनला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली असून पोलिसांनी आरोपी क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रोहित लक्ष्मण काटेकर (२८, रा. मिनिमातानगर कळमना) असे आरोपी क्रेन चालकाचे नाव आहे. जुना काटोल नाका येथील महावितरणच्या कार्यालयातील सहायक अभियंता शामराव बापुजी ऐनगंटीवार (५०, रा. लक्ष्मी अपार्टमेंट राठोड ले आऊट, अनंतनगर) यांनी परिसरातील डीपी बदलण्यासाठी आरोपी रोहितला क्रेन क्रमांक एम. एच. ३१, सी. व्ही. ७१७४ घेऊन बोलावले होते. डीपी बदलल्यानंतर क्रेन चालक आरोपी रोहित गोरेवाडा वॉटल फिल्टर जवळील सिमेंट रोडवरून जात असताना एक ५० वर्ष वयोगटातील अनोळखी महिला क्रेनसमोर आल्याने क्रेनचे चाक महिलेच्या अंगावरून गेल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शामराव ऐनगंटीवार यांनी दिलेल्या सुचनेवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी क्रेन चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.