नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाद झाल्यानंतर संतापात पतीने स्वत:चे डोके शिलाई मशीनवर आपटून आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या पत्नीने केला होता. परंतु शवविच्छेदनातून नेमके सत्य समोर आले. दारूड्या पतीच्या सततच्या छळवणुकीमुळे त्रासलेल्या महिलेने त्याचा गळा आवळून व डोक्यावर वार करून त्याची हत्या केली व त्यानंतर त्याने आत्महत्या केल्याची बतावणी केली.
मोहनलाल वाजपेयी नगर येथे ग्यानी मनराखन यादव (३८) हा शनिवारी रात्री ११ वाजता घरी आला व त्याने त्याची पत्नी- मुलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यावर त्याच्या पत्नीने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. संतापाच्या भरात त्याने घरातील लोखंडी शिलाई मशीनवर स्वत:चे डोके आपटले. यात त्याचा मृत्यू झाला अशी तक्रार त्याची पत्नी राणी यादव हिने केली होती.
परंतु शवविच्छेदनातून सत्य समोर आले. ग्यानी व राणीचे १८ वर्षांअगोदर लग्न झाले होते. त्याला दारूचे व्यसन होते व त्यातून तो पत्नी व मुलांना त्रास द्यायचा. रानी कपडे शिवून घर चालवायची. ३० जुलै रोजी तो नेहमीप्रमाणे घरी आला व त्याने वाद घालायला सुरुवात केली. मुले झोपली होती व नशेत तो खाली पडला. सततच्या वादाने त्रासलेल्या रानीने दोरीने गळा आवळून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा मृत्यू न झाल्याने त्याच्या डोक्यावर रॉडने प्रहार केले.
ग्यानीला मारल्यानंतर राणीने शेजाऱ्यांना माहिती दिली. मिळालेल्या सूचनेवरून कळमना पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विचारपूस केल्यावर पतीने शिलाई मशीनवर डोके आपटल्याची माहिती राणीने दिली व त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदनाच्या अहवालात ग्यानीच्या डोक्याला खोल जखमा असल्याचे आढळून आले. शिलाई मशीनवर डोकं आपटल्याने कपाळाला दुखापत झाली असती. परंतु डोक्याला दुखापत झाल्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी राणीकडे चौकशी केली असता सत्य समोर आले. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, राणीची चौकशी करण्यात येत आहे.