महापुरुषांचा अपमान, सीमाप्रश्नावर हिवाळी अधिवेशन तापणार; पुर्वसंध्येलाच आरोप-प्रत्यारोपांचे सत्र

By योगेश पांडे | Published: December 18, 2022 11:05 PM2022-12-18T23:05:25+5:302022-12-18T23:06:56+5:30

विरोधक-सत्ताधारी आमनेसामने, पहिला दिवस गोंधळाचाच ठरण्याची चिन्हे

the winter session will heat up on the border issue and Insulting great men | महापुरुषांचा अपमान, सीमाप्रश्नावर हिवाळी अधिवेशन तापणार; पुर्वसंध्येलाच आरोप-प्रत्यारोपांचे सत्र

महापुरुषांचा अपमान, सीमाप्रश्नावर हिवाळी अधिवेशन तापणार; पुर्वसंध्येलाच आरोप-प्रत्यारोपांचे सत्र

googlenewsNext

 

नागपूर: तीन वर्षांच्या कालावधीनंतर नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन चांगलेच तापणार असल्याची चिन्हे आहेत. महापुरुषांचा अपमान आणि सीमाप्रश्न या मुद्द्यांवर विरोधक व सत्ताधारी आमनेसामने आले असून सभागृहामध्येदेखील याचे पडसाद उमटणार आहेत. अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला विरोधकांनी केलेल्या आरोपांवर सभागृहात आकडेवारीसह उत्तरे देऊ अशी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतल्याने पहिला दिवस गोंधळाचाच ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विरोधकांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी रविवारी पत्रपरिषदेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. विरोधकांचे आरोप पद्धतशीरपणे फेटाळून लावत त्यांनी सभागृहात आकडेवारी मांडून विदर्भाचा अनुशेष कोणी वाढवला हे सांगितले जाईल, असे जाहीर केले. तर महापुरुषांबाबत बोलण्याचा महाविकासआघाडीला अधिकारच नसल्याचा दावा केला. हे खोके किंवा स्थगिती सरकार नसून कायदेशीर आणि बहुमताचे सरकार आहे. २०१९ चे सरकार अनैतिक होते. सोयरिक एकाशी, घरोबा दुसऱ्याशी केली होती. मागच्या सरकारमध्ये विदर्भातील मंत्र्यांनी, आमदारांनी नागपुरात अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. पण कोविडचे कारण देऊन नागपूरमध्ये अधिवेशन घेण्याचं टाळण्यात आले. हे अजितदादांनाही माहिती आहे. त्यामुळे ते त्यावर फारसे बोलणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

आता विदर्भाचा कळवळा कसा ?
२०१९-२० मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात विदर्भातील ७ जिल्ह्यांच्या ‘डीपीसी’च्या निधीत कपात करण्यात आली होती. तेव्हापासूनच अन्यायाची शृंखला सुरू झाली. कोरोनाच्या नावावर ज्यांनी नागपुरात अडीच वर्षांत एकही अधिवेशन घेतले नाही, त्यांना आता विदर्भाचा कळवला कसा आला असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. विदर्भाचा अनुशेष कुणी व कसा वाढविला याचे आकडेच सभागृहात मांडू असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांना महापुरुषांवर बोलण्याचा अधिकार नाही
फडणवीस यांनी महापुरुषांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधकांना यासंदर्भात बोलण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षाचे नेते वारकऱ्यांचा अपमान करत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला हे त्यांना माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे सरकारसाठी पूजनीय आहेत. या संदर्भात राजकारण केल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे फडणवीस म्हणाले.

सरकारचे लव्हासा करायचे नाही
विरोधकांनी सरकारला खोके सरकार म्हटले. मात्र अजित पवारांची भाषा असंसदीय आहे. आता ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ असे प्रकार होत नाही. आम्हाला सरकारचे ‘लव्हासा’ करायचे नाही. महाविकास आघाडीने केलेले प्रकार उघड झाल्यास खोक्याचे उंच शिखर होईल व ते त्यावरून खाली पडतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

चार आठवड्यांचे अधिवेशन घेण्याची तयारी
तीन आठवड्यांचे अधिवेशन घेण्याच्या विरोधकांच्या मागणीवर फडणवीस म्हणाले की, विरोधकांना नागपूरचे वातावरण आवडत असेल तर सरकार चार आठवड्यांचे अधिवेशन घेण्यासही तयार आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या प्रश्नांना न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.

शिवसेना की ‘नॅनो’सेना ?
दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेचा (उद्धव ठाकरे गट) उल्लेख ‘नॅनो’सेना असा केला. विधीमंडळात शिवसेनेचे कार्यालय कुणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू असताना त्यांनी कोणती शिवसेना म्हणायची आहे, असा उल्लेख करत ‘नॅनो’सेना असे म्हटले.

Web Title: the winter session will heat up on the border issue and Insulting great men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.