नागपूर : कामावरून घरी परतणाऱ्या महिलेची बॅग हिसकावून पळ काढणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
१७ नोव्हेंबर २०२३ रोजी अलका सुरेंद्र सांगोळे (४२) या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कामावरून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी बॅग हिसकावून पळ काढला होता. त्यात दोन मोबाईल, रोख रकमेसह ३० हजारांचा मुद्देमाल होता. त्यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेच्या पथकाकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी आकाश निवृत्ती चंदनखेडे (३०, न्यू इंदोरा, जरीपटका) व अश्वीन वामनराव माहुरे (३६, न्यू इंदोरा, जरीपटका) यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून दोन मोबाईल फोनसह दुचाकी व इतर असा १.२० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे, समाधान बजबळकर, मधुकर काठोके, सतिश पांडे, दशरथ मिश्रा, विजय श्रीवास, संतोषसिंह ठाकूर, जितेश रेड्डी, दीपक दासरवार, विशाल रोकडे, प्रमोद देशभ्रतार, दीपक लाकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.