वसीम कुरैशी
नागपूर : हावडा-मुंबई मार्गावर राजनांदगाव ते नागपूरपर्यंत तिसऱ्या लाइनचे काम केले जात आहे. २०१७ मध्ये सुरू झालेले हे काम पाच वर्षांत ३० टक्केही पूर्ण झाले नाही. मार्गातील सालेकसा दरेकसा घाट सेक्शनवर आतापर्यंत वाइल्डलाइफ क्लिअरेंस न मिळाल्याने हे काम अडकून पडले आहे. दुसरीकडे या कामाचा खर्च १५०० कोटींवरून ३ हजारांवर गेला आहे.
सूत्रांनुसार, सध्याच्या रेल्वे ट्रॅकची सेक्शन कपॅसिटी १०० टक्क्यांवर जाण्यापूर्वीच येथे थर्ड लाइनचे काम व्हायला हवे होते. मात्र, आता २०० टक्क्यांपर्यंत कपॅसिटी जाऊनही काम झाले नाही. २०१६ मध्ये आर्थिक प्रकरणाच्या कॅबिनेट समितीने या प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर केला होता. २०१७ मध्ये वैनगंगा आणि कन्हान नदीच्या पुलाच्या कामासोबत हे काम सुरू झाले. आता भंडारा, तुमसर, बोरतलाव ते दरेकसा, राजनांदगाव ते बोरतलावपर्यंत सुमारे ६६ किलोमीटर काम झाले आहे. २२८ किमीच्या लांबीच्या या परियोजनेसाठी अनेक ठिकाणची भूमी अधिग्रहित करण्यात आली. ४० किलोमीटरच्या जंगल आणि पहाडी भागात अनेक ठिकाणी बोगदेही आहेत.
गाड्यांच्या आवागमनाला गती मिळेल
मुंबई-हावडा मार्गावरील नागपूर-राजनांदगाव सेक्शनवर थर्ड लाइनच्या कामामुळे वारंवार रेल्वेगाड्या रद्द केल्या जातात. अनेकदा पॅटर्न बदलला जातो. थर्ड लाइनचे काम पूर्ण झाल्यास रेल्वेची आवक वाढेल आणि पॅसेंजर गाड्यांच्या आवागमनाला गती मिळेल.
वाइल्डलाइफ क्लिअरेंस बाकी
सालेकसा-दरेकसा सेक्शनवर वाइल्डलाइफ क्लिअरेंस आतापर्यंत मिळाला नाही, हे खरे आहे. फॉरेस्ट क्लिअरेंस खूप आधीच झाले आहे. या प्रकल्पासाठी अनेक ठिकाणी भू-अधिग्रहण झाले आहे.
मनिंदर उप्पल, मंडळ रेल्वे व्यवस्थापक, दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे